(संगमेश्वर / प्रतिनिधी )
वारंवार वृत्त प्रसिद्ध होवून अथवा निवेदनं देवून देखील करजुवे खाडी मधील चोरटा वाळू उपसा थांबायला तयार नाही. या वाळू उपाशाला महसूलच्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने आपण आवश्यक ते पुरावे आणि छायाचित्रासह आज महसूल मंत्र्यांना ईमेल द्वारे निवेदन दिल्याचे संभाजी ब्रिगेडचे परशुराम पवार यांनी सांगितले.
करजुवे खाडीतील चोरट्या वाळू उपाशावर किरकोळ कारवाई केल्याचा फार्स महसूल विभागातर्फे केला जातो. बुधवारी रात्री बंद असणारे पाईप महसूल विभागाने फोडून टाकले मात्र त्या बाजूला असणाऱ्या शंभर ब्रास वाळूच्या साठ्यावर मात्र कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्यानंतर दोन दिवस चोरटा वाळू उपसा बंद ठेवण्यास सांगितले जाते. याबाबत वाळू माफिया तडजोडीची भूमिका घेतात.
याबाबत मुंबई गोवा महामार्गावरील एका प्रख्यात हॉटेलमध्ये सलग दोन दिवस महसूल विभागाच्या एका बड्या अधिकाऱ्या सोबत बैठक पार पडली. या बैठकित या अधिकाऱ्याने काही अटी घातल्या. अखेर तडजोडीअंती करजुवे खाडीत १ मे महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर बेसुमार वाळू उपसा करायला तोंडी परवानगी मिळाल्याने आपण आवश्यक त्या छायाचित्र आणि पुराव्यासह आजच महसूल मंत्र्याना ईमेल केला आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडच्या परशुराम पवार यांनी दिली. आता याबाबत महसूल आयुक्त या अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात यावर आपण पुढील भूमिका घेणार असल्याचे पवार यांनी सांगितलं.