(लांजा)
प्रचार, प्रसार, प्रबोधन, प्रयत्न आणि प्रमाण या पंचसूत्री तत्त्वांवर कार्यरत असलेल्या श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळातर्फे १६वे एकदिवसीय ज्योतिष संमेलन नुकतेच मठ येथील गोरखनाथ मंगल कार्यालयात उत्साहात पार पडले. या संमेलनाला ९० हून अधिक ज्योतिष अभ्यासक आणि ज्योतिषप्रेमींनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमात आयादी ज्योतिष वास्तू संस्थेच्या अध्यक्षा शुभांगिनी पांगारकर यांना पद्मश्री, पंढरपूर येथील ज्योतिषी राधेश बादले-पाटील यांना कार्यगौरव, विलास काणे यांना चैतन्य भूषण, नलिनी पवार व पल्लवी जोशी यांना चैतन्यसेवा तर कल्पना देशपांडे यांना ज्योतिषाचार्या डॉ. सविता कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा सर्वोत्कृष्ट शिष्या हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात कुंडली विशारद, कुंडली भूषण, कुंडली भास्कर, वैदिक पंडित, वास्तुशास्त्र विशारद, हस्तसामुद्रिक प्राज्ञ/विशारद, मुखचर्याशास्त्र प्रवीण/प्राज्ञ/विशारद या अभ्यासक्रमांत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान व गौरव समारंभही यावेळी पार पडला.
या प्रसंगी कोल्हापूर येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. अमित पवार, ज्योतिष गुरूश्री प्रिया मालवणकर, संजीवनी ज्योतिष ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास खिलारे, त्र्यंबकेश्वर येथील गुरूजी गिरीश लोहगावकर, पुण्याचे ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासक नारायण सुखटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सात अभ्यासकांना विशेष लक्षवेधी, तर इतर २१ अभ्यासकांना लक्षवेधी उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच परीक्षेत यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या संमेलनानिमित्ताने अलीकडेच भूगर्भ जलशोध या विषयावर विशेष कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली होती. जमिनीखालील पाण्याचा अचूक शोध घेण्यासाठी विविध साधनांचा वापर कसा करावा, याविषयी डॉ. प्रसन्न मुळे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत महाराष्ट्र व गोवा राज्यांतील विविध भागांतील २२ अभ्यासकांनी सहभाग घेतला.