(लांजा)
खोडसाळ व बनावट कागदपत्रे तयार करून पत्नी, मुलांच्या आणि नातेवाइकांच्या नावाने सरकारी योजनांच्या कामांची ठेकेदारी परस्पर घेऊन मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या बेनी खुर्द खेरवसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्यांविरोधात ग्रामस्थांनी बुधवारी आक्रमक पवित्रा घेत हल्लाबोल केला. न्याय मिळत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीमधून हटणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. मनमानी करणाऱ्या सदस्यांवर कठोर व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
बेनी खुर्द खेरवसे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय बंडबे (बेनी खुर्द) व सदस्य किरण गुरव (खेरवसे) यांनी व अन्य सदस्यांनी उपसरपंच विजय बंडवे (बेनी खुर्द) व सदस्य किरण गुरव (खेरवसे) यांनी व अन्य सदस्यांनी सरकारी योजनांच्या कामांमध्ये मनमानी कारभार केला असल्याचा आक्षेप घेत ग्रामस्थांनी लांजा गटविकास अधिकाऱ्यांना २० डिसेंबर २०२४ रोजी चौकशीची मागणी करणारे निवेदन दिले होते. गटविकास अधिकाऱ्यांनी ९ जानेवारी २०२५ रोजी चौकशी करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, ती तारीख टळून गेल्याने ग्रामस्थांनी पुन्हा गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन विचारणा केली. बैठकीचे कारण देत ५ फेब्रुवारीला चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले होते.
बुधवारी पंचायत समिती प्रशासनाकडून विस्तार अधिकारी संजय लोखंडे हे ग्रामपंचायतीत चौकशीसाठी आले. मात्र, चौकशी तहकूब करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगताच ग्रामस्थांनी त्यांना ग्रामपंचायतीतच रोखून धरले. वरिष्ठ अधिकारी येत नाहीत तोपर्यंत येथून जायला देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.
या आक्रमक भूमिकेमुळे तासाभराने लोखंडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. सहायक गटविकास अधिकारी हिंदूराव गिरी व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तब्बल चार तास ग्रामस्थांनी ठिय्या मांडला होता. ग्रामस्थांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून अखेर पोलिसही घटनास्थळी आले. आजच चौकशी करून अहवाल द्यावा, असा आग्रह ग्रामस्थांनी धरल्याने १०:३० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत चौकशी प्रक्रिया सुरू होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितल्यानंतर तणाव निवळला.