(देवरूख / सुरेश सप्रे)
देवरूख शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे, नगर पंचायत प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरीक संताप व्यक्त करीत आहेत.
शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेक रस्त्यांवरील डांबरीकरण उखडून बारीक खडी उघडी पडली असून, त्यामुळे पावसात वाहतूक आणखी धोकादायक ठरत आहे.
“रस्ता की खड्डा?” त्रस्त नागरिकांचा सवाल
चोरपऱ्या, महाडीक स्टॉप, पंचायत समिती, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजवाडे चौक, मारुती मंदिर चौक (ग्रामीण रुग्णालय), स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आणि भूमी अभिलेख कार्यालयाकडे जाणारे रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत. अनेक रस्त्यांचे डांबरीकरण मे महिन्यात झाले असले तरी पावसाळा सुरू होतानाच ते उखडून गेले, हे निकृष्ट दर्जाच्या कामाचे स्पष्ट लक्षण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेषतः पंचायत समिती, महाडीक स्टॉप आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या मार्गावरील खड्डे इतके खोल आहेत की त्या खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनचालकांची चांगलीच कसोटी लागते. या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून, वाहनांचे नुकसान आणि आर्थिक भार सामान्य जनतेच्या खिशाला चटका लावत आहे.
कामे निकृष्ट, निष्क्रिय प्रशासन व गप्प लोकप्रतिनिधी
शहरातील डांबरीकरणाची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप वाहनचालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील साटेलोटे असल्यानेच ही कामे तपासणीविना मंजूर होत असल्याचे आरोपही खुलेआम व्यक्त केले जात आहेत.
“निवडणुकीच्या काळात ‘आम्ही जनतेचे कैवारी आहोत’ म्हणणारे प्रतिनिधी आता मात्र रस्त्यांची दुर्दशा पाहूनही गप्प का बसले आहेत?” असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या उदासीनतेमुळे संतप्त नागरिक सोशल मिडियावर आणि सार्वजनिक ठिकाणी आपल्या नाराजीचा सूर आहे.