(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातील मजगांव येथील डाॅ. अब्दुल्ला अब्दुल मजीद इब्जी यांनी छत्रपती संभाजी नगर येथील एम्.जी.एम्. वैद्यकीय महाविद्यालयातून एम्.डी. चे शिक्षण पूर्ण केले. एम्.जी.एम. महाविद्यालयाने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पदव्या प्रदान केल्या. त्या मध्ये डाॅ. अब्दुल्ला इब्जी यांनी अभिमानाने पदवी स्वीकारली.
रत्नागिरी मजगांव येथील त्यांना पहिले एम्.डी. डाॅक्टर होण्याचा बहुमान मिळाला. अब्दुल्ला इब्जी हे सामान्य कुटुंबातील असून आपल्या मेहनतीने आई कैसर बेगम, वडील अब्दुल मजीद यांच्या आर्शिवादाने तसेच त्यांच्या प्रेरणेने, आपल्या आत्या सेवानिवृत्त शिक्षिका फरीदा हकीम यांच्या उत्तेजनाने, चुलते एजाज इब्जी, शरीफ इब्जी, आजोबा दाऊद हमदुले, मामा अकील हमदुले, रियाज हमदुले यांच्या मार्गदर्शनाखाली मन:पूर्वक अभ्यास करून हे यश पटकावले आहे. ही पदवी बहाल करताना एम्.जी.एम्. वैद्यकीय महाविद्यालयाचे डाॅ. प्रवीण शिंदे, डाॅ. अशोक पाटील, डाॅ. विजय कदम तसेच डाॅ.मधूरा नेलानुथूला उपस्थित होत्या.
घरी पूर्वीपासूनच शैक्षणिक वातावरण असल्याने त्यांची अभ्यासात रुची वाढत गेली. आता डॉ. अब्दुल्ला हे एम्. डी. मेडिसीन या पदवी वरच न थांबता पुढे डी.एम्. गॅस्ट्रो शिक्षणासाठी त्यांनी केरल येथील मलाबार वैद्यकीय महाविद्यालयात नुकताच प्रवेशही घेतला आहे. उच्च शिक्षण घेऊन रत्नागिरी येथील रुग्णांची सेवा करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांची बहीण अमीना इब्जी ही सुद्धा एम्.बी.बी.एस्. करीत असल्याने त्यांना सोबत घेऊन सेवा करण्याची इच्छा आहे.
त्यांच्या पदवीप्रदान सोहळ्यासाठी आई वडील, नातेवाईक उपस्थित होते. नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी, चाहत्यांनी, मजगांव येथील शिक्षण प्रेमी सरपंच फैयाज मुकादम, मुरादपूर चिपळूण आणि मजगांव येथील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

