(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरासह जिल्ह्यात रिक्षाने प्रवास करताना मीटरनेच भाडे आकारणे बंधनकारक असतानाही प्रत्यक्षात काही ठिकाणी हा नियम धाब्यावर बसवला जात आहे. मीटर न वापरता ठराविक किंवा अवाजवी भाड्याची मागणी केली जाते. ‘वाद नको’ म्हणून प्रवासी निमूटपणे पैसे मोजतात; मात्र मीटरप्रमाणे भाडे न घेणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात थेट तक्रार करण्याचा अधिकार प्रवाशांना आहे.
परिवहन विभागाने प्रत्येक जिल्ह्यासाठी रिक्षांचे अधिकृत दरपत्रक निश्चित केले आहे. त्यानुसारच भाडे आकारणे बंधनकारक आहे. तरीही काही रिक्षा चालक ‘मीटर बंद आहे’ किंवा ‘मीटर सुरू करायला विसरलो’ अशी कारणे पुढे करत मनमानी भाडे उकळतात. ही सर्व कारणे नियमबाह्य असून अशा प्रकारांविरोधात आरटीओ कार्यालयात लेखी तक्रार करता येते. यासोबतच ई-मेल व व्हॉट्सॲपद्वारेही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. मीटरने प्रवास हा प्रवाशांचा हक्क आहे. मनमानी भाड्याला बळी न पडता नियमांची माहिती ठेवून तक्रार नोंदविणे, हाच या प्रवृत्तीला आळा घालण्याचा प्रभावी मार्ग आहे.
रिक्षा व्यावसायिकांनी प्रवासी वाहतूक मीटरच्या रीडिंगनुसारच करणे बंधनकारक आहे. रात्री १० वाजल्यानंतर मीटरच्या रीडिंगच्या दीडपट भाडे आकारण्याची मुभा आहे. मात्र, या नियमाचा गैरफायदा घेत काही चालक भरमसाठ भाडे मागतात, हे नियमांचे सरळ उल्लंघन आहे. रेल्वे किंवा बसने उशिरा पोहोचलेले प्रवासी थकलेले व अडचणीत असतात. या परिस्थितीचा फायदा घेत काही रिक्षा चालक अवाजवी भाड्याची मागणी करतात. वेळेअभावी किंवा वाद टाळण्यासाठी प्रवासी तो भुर्दंड सहन करतात.
अधिकृत दरपत्रक काय?
मीटरप्रमाणे १.६ किलोमीटरपर्यंत भाडे ३१ रुपये आहे. त्यानंतर प्रत्येक १ किलोमीटरसाठी २० रुपये ४९ पैसे आकारण्याचा नियम परिवहन विभागाने लागू केला आहे.
तक्रार कुठे कराल?
भरमसाठ भाडे घेणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात रत्नागिरी येथील आरटीओ कार्यालयात लेखी तक्रार करता येते. तसेच ई-मेल : dyrto.08_mh@gov.in
व्हॉट्सॲप : ८२७५१०१७७९
या माध्यमातूनही तक्रार नोंदविता येईल.

