(दापोली)
मळे (ता. दापोली) येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेत कृषी महाविद्यालय, दापोलीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी कृषी दिनानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबवत ड्रॅगन फळ शेतीविषयी ग्रामीण शेतकऱ्यांना प्रेरणा दिली.
रावे कार्यक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमास महाविद्यालयाचे नव्याने नियुक्त झालेले सहयोगी अधिष्ठाता डॉ. कुणकेरकर, विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. वरवडेकर, रावे प्रोग्राम ऑफिसर डॉ. प्रविण झगडे, तसेच डॉ. आशिष शिगवण व डॉ. मंदार पुरी यांची उपस्थिती होती. गावचे सरपंच श्री. दिनेश आडविलकर, कृषी सहाय्यक सौ. सावके मॅडम, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिनेश चिपटे व शिक्षकवर्गही कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले गुडघे गावातील प्रगतशील शेतकरी श्री. मंदार दांडेकर यांचे ड्रॅगन फळ शेतीवरील सादरीकरण. त्यांनी या नगदी पिकाच्या लागवडीपासून उत्पादन आणि बाजारपेठेपर्यंत सविस्तर मार्गदर्शन केले. ऑडिओ-व्हिज्युअल माध्यम वापरून सादर केलेली माहिती प्रभावी ठरली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यानंतर विद्यार्थिनींनी मान्यवरांचे स्वागत स्वतः तयार केलेल्या सीड बॉल्स देऊन केले, हे कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. यानंतर शाळेजवळ व वारेबुवा मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पारंपरिक कृषी दिंडीने झाली, ज्यात विद्यार्थ्यांनी शेतकरी वेशभूषा परिधान करून कृषी जीवनाचे चित्र उभं केलं.
हा उपक्रम विद्यार्थिनींच्या नेतृत्वात, शिक्षक व ग्रामस्थांच्या सहभागातून पार पडला. शेतीतील नवकल्पना, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण जनजागृती साधणारा हा उपक्रम भविष्यातील शाश्वत शेतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.