( संगमेश्वर / प्रतिनिधी )
शालेय अभ्यासाबरोबरच अन्य उपक्रमात सहभाग घेऊन शालेय जीवनात मिळणारी पारितोषिके ही आपल्या कठोर मेहनतीचे द्योतक असतात. यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी मेहनत, जिद्द आणि चिकाटी हे गुण असणे आवश्यक असते. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांकडून अन्य विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वरचे अध्यक्ष अनिल शेट्ये यांनी केले.
व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ नुकताच संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनिल शेट्ये हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य रमेश झगडे, संदीप सुर्वे, ग्रामस्थ नंदकुमार कुष्टे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे, कसबा माजी सरपंच शिगवण, प्रशालेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन देव खामकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. प्रशालेने वर्षभरात केलेल्या प्रगतीचा त्यांनी थोडक्यात आढावा घेतला. तालुका जिल्हा आणि राज्य स्तरावर विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेले यश हे शाळा आणि संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचे खामकर यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे यांनी संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.
यावर्षीचा आदर्श विद्यार्थी म्हणून इयत्ता दहावीतील ओमकार नंदकुमार पवार तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून दहावीतील प्रांजल प्रमोद गुरव यांची निवड करण्यात आली. या दोघांनाही संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये आणि उपाध्यक्ष किशोर पाथरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याबरोबरच राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या क्रिशा कपिल इंदानी, एन एम एम एस स्पर्धा परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत यश प्राप्त केलेल्या प्रज्ञा गणपत कांबळे यांना सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे यांनी भेटवस्तू देऊन त्यांचे अभिनंदन केले. विविध देणगीदारांच्या ठेवीतून विविध विषयात यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे आणि आभार प्रदर्शन पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी केले.
फोटो :
१) प्रशालेचा आदर्श विद्यार्थी म्हणून ओंकार नंदकुमार पवार याचा सन्मान करताना संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये
२) प्रशालीची आदर्श विद्यार्थिनी म्हणून प्रांजल प्रमोद गुरव हिचा सन्मान करताना संस्था उपाध्यक्ष किशोर पाथरे