(देवरूख)
देवरूख-संगमेश्वर मार्गावरील कोसुंब येथील स्वामी समर्थ मठाजवळ रविवारी सकाळी ९.१५ वाजता एक दुर्दैवी घटना घडली. रस्त्यालगत उभ्या असलेल्या महिलेवर क्रेनने जोरदार धडक दिल्याने त्या क्रेनच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाल्या. या महिलचे नाव सावित्री राजाराम सावंत (वय ६५, रा. कनकाडी एरंडेवाडी, ता. संगमेश्वर) असे आहे.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, जयेंद्र गजानन सावंत (रा. कनकाडी एरंडेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, रविवारी सकाळी ते व सावित्री सावंत हे दुचाकीवरून (क्रमांक एमएच-०८ एन-०३८८) बुरंबी येथील मुलीकडे जात होते. कोसुंबजवळील स्वामी समर्थ मठाजवळ त्यांनी दुचाकी थांबवली असता सावित्री सावंत या रस्त्यालगत उभ्या होत्या.
दरम्यान, एहम्मद अली रझा (वय २७, रा. उत्तर प्रदेश) याच्या ताब्यातील क्रेन (क्रमांक एमएच-४३ बी-१३४५) देवरूखहून संगमेश्वरच्या दिशेने जात होती. क्रेनवरील नियंत्रण सुटल्याने क्रेनने सावित्री सावंत यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या अपघातप्रकरणी एहम्मद रझा याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन अधिनियमातील कलम १८४, ३(१)/१८१ अंतर्गत देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव करत आहेत.