(हैदराबाद)
दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. 26 फेब्रुवारी रोजी दोघं लग्न करणार असल्याच्या बातम्या आणि चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. या पार्श्वभूमीवर आता विजय आणि रश्मिकाच्या व्यवस्थापन टीमनं अधिकृत निवेदन जारी करत गोपनीयतेचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे.
या स्टार्सच्या लग्नाची अधिकृत घोषणा झालेली नाही. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर या लग्नाचं आमंत्रण पत्र झपाट्याने पसरलं. या कार्डमध्ये 26 फेब्रुवारीला विवाह आणि 4 मार्च रोजी हैदराबादमधील ताज कृष्णा हॉटेल येथे भव्य रिसेप्शन होणार असल्याचा उल्लेख आहे. विशेष बाब म्हणजे काही युजर्सनी या कार्डवर असलेले वैयक्तिक संपर्क क्रमांकही सार्वजनिक केले आहेत.
टीमचं निवेदन
या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत व्यवस्थापन टीमनं सांगितलं की, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती पसरवणं अयोग्य आहे. यामुळे लग्नासाठी येणाऱ्या VIP पाहुण्यांना अडचणी येऊ शकतात आणि गंभीर सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात. “लग्न हा पूर्णपणे खाजगी सोहळा आहे. कृपया कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान राखावा,” असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
टीमनं हेही स्पष्ट केलं की, काही निवडक पाहुण्यांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र आमंत्रण पत्र आणि संपर्क तपशील लीक झाल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठी चिंता निर्माण झाली आहे. या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रातील काही मोजकेच मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने सर्व तयारी अत्यंत गोपनीयतेनं केली जात आहे. लग्नासाठी केवळ कुटुंबीय आणि अतिशय जवळचे मित्रच या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
ग्रँड वेडिंगमध्ये ‘नो फोन पॉलिसी’
उपलब्ध माहितीनुसार रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी आपला विवाह अत्यंत खासगी स्वरूपात पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. हा सोहळा पूर्णपणे लो-की ठेवण्यात येणार असून, यासाठी कोणतीही मीडिया कव्हरेज दिली जाणार नाही. विशेष म्हणजे, लग्नादरम्यान ‘नो फोन पॉलिसी’ लागू असणार आहे. पाहुण्यांना मोबाईल फोन सोबत ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही, जेणेकरून विवाहाचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ नयेत. एकूणच, ग्लॅमर वर्ल्डमधील ही ‘ग्रँड वेडिंग’ गाजावाजा आणि झगमगाटापासून दूर, शांत आणि खासगी पद्धतीने पार पडणार असल्याचं चित्र आहे.
लग्नानंतर अभिनयातून अल्पविराम
विवाहानंतर नव्या आयुष्याची सुरुवात करताना दोघेही स्वतःसाठी वेळ काढू इच्छित असून, सुमारे एक महिन्याचा अभिनयातून ब्रेक घेण्याची शक्यता आहे. विजय देवरकोंडाकडे सध्या ‘राणाबाली’ हा चित्रपट असून, यात त्यांच्या समोर रश्मिका मंदान्नाच दिसणार आहेत. हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘राउडी जनार्दन’ या चित्रपटातही विजय झळकणार असून, तो डिसेंबरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
रश्मिकाच्या आगामी प्रकल्पांमध्ये ‘कॉकटेल 2’चा समावेश आहे. तसेच ‘पुष्पा’मधील सहकलाकार अल्लू अर्जुन यांच्या आगामी ‘AA22xA6’ या चित्रपटात त्या नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे.

