(चिपळूण)
पती, सासरा आणि आणखी एका महिलेच्या सततच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळाला कंटाळून एका विवाहितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यात समोर आली आहे. दोनच दिवसांपूर्वी आत्महत्येच्या घटनेने हादरलेल्या परिसरात, या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात साजिद सिराज पाटकरी (पती), सिराज पाटकरी (सासरे) आणि एक अज्ञात महिला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा छळ २०१२ च्या जून महिन्यापासून नोव्हेंबर २०२२ पर्यंत सुरु होता. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, या तिघांनी संगनमत करून पीडितेला वेळोवेळी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि तिच्या मुलासह संगोपनाची जबाबदारी नाकारली. इतकंच नव्हे तर, गेल्या तीन वर्षांपासून पतीने कोणत्याही प्रकारचा वैवाहिक संबंध ठेवलेला नाही, अशी माहितीही पीडित महिलेने दिली आहे.
या प्रकारामुळे विवाहितेला गंभीर मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला असून, अखेर तिने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी २७ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या चिपळूण पोलीस अधिक तपास करत असून, आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.