(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था)
शहरातील सिडको एन-७ परिसरातील बजरंग चौकात दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. देवेश चंद्रेश दीक्षित ऊर्फ बंटी दीक्षित या युवा व्यावसायिकाची भररस्त्यात हत्या करण्यात आली. पवन पराशर असे आरोपीचे नाव असून, त्याने कारने बंटी यांच्या बाईक धडक दिल्यानंतर लोखंडी रॉडने त्यांच्या चेहऱ्यावर वार केले. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, त्यात हल्ल्यानंतर आरोपी कार घेऊन घटनास्थळावरून जाताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर आरोपी स्वतः कार घेऊन सिडको पोलीस ठाण्यात हजर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बंटी दीक्षित हे नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जिममध्ये गेले होते. तेथून घरी परतत असताना पवन पराशर कारने त्यांचा पाठलाग करत होता. बंटी यांनी पवनला पाहिल्यानंतर बाईक थांबवली. त्यानंतर दोघे एका पानटपरीवर गेले. तेथे त्यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे. या वादानंतर बंटी आपल्या बाईकवरून घराकडे निघाले; मात्र पवनने त्यांचा पाठलाग सुरू केला.
बजरंग चौकातील मंगेश गॅस एजन्सीसमोर पवनने वेगाने कार आणून बंटी यांच्या बाईकला मागून जोरदार धडक दिली. धडकेच्या तीव्रतेमुळे बंटी बाईकवरून उडून कारच्या काचेवर आदळले आणि त्यानंतर डिव्हायडरवर कोसळले. त्यांची दुचाकीही सुमारे १५० फूट दूर फेकली गेल्याची माहिती आहे. त्यानंतर पवनने कार पुढे नेऊन रस्त्यावर आडवी लावली. तो लोखंडी रॉड घेऊन कारमधून उतरला आणि बंटी यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या चेहऱ्यावर रॉडने अनेक वार करण्यात आले. या हल्ल्यात बंटी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीच्या कारमधून चाकू आणि लोखंडी रॉड जप्त केल्याची माहिती आहे.
हत्येनंतर पवन पराशर फरार न होता स्वतः कार घेऊन सिडको पोलीस ठाण्यात गेला आणि तेथे हजर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. बंटी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
मृत बंटी दीक्षित हे प्लॉटिंग व्यवसायासह मेस चालवत होते. जिममधून घरी परतताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. कामाच्या निमित्ताने त्यांचे अनेकांशी वाद होत असल्याची माहिती असून, आरोपी पवन पराशर याच्याशीही काही वाद असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जुन्या वादातून हा प्रकार घडला का, वादाचे स्वरूप काय होते आणि हत्येमागे अन्य काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
भरवस्तीत आणि वर्दळीच्या चौकात घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर काही काळ परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली होती. भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. मृताच्या कुटुंबीयांनी आक्रोश करत न्यायाची मागणी केली आहे.


