(नाशिक / वृत्तसंस्था)
चार्टर्ड अकाउंटंट्स (सीए) इंटरमिजिएट परीक्षेत नाशिकच्या साक्षी चांडक हिने देशात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला आहे. मुंबईचा नील शाह आणि साक्षी चांडक यांनी प्रत्येकी 600 पैकी 502 गुण मिळवत 83.67 टक्के गुणांसह संयुक्तपणे देशात अव्वल स्थान मिळवले. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) तर्फे सप्टेंबर 2026 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, साक्षीच्या यशामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सीए इंटरमिजिएट परीक्षेच्या निकालानुसार, ग्रुप 1 मध्ये 1 लाख 301 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 23 हजार 210 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या गटाचा उत्तीर्णतेचा दर 23.14 टक्के आहे. ग्रुप 2 मध्ये 68 हजार 400 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 12 हजार 938 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या गटाचा निकाल 18.92 टक्के लागला आहे. दोन्ही गटांची परीक्षा देणाऱ्या 38 हजार 339 विद्यार्थ्यांपैकी 5 हजार 66 उमेदवार उत्तीर्ण झाले. या गटाचा उत्तीर्णतेचा दर 13.21 टक्के आहे. परीक्षेच्या निकालात साक्षी चांडक आणि नील शाह यांनी मिळवलेले संयुक्त अव्वल स्थान विशेष ठरले आहे.
साक्षीच्या यशाबद्दल तिचे वडील प्रकाश चांडक यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “माझी मुलगी साक्षी सीएच्या परीक्षेत देशात प्रथम आली, ही वडील म्हणून माझ्यासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून देशात प्रथम येणे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अकॅडमीच्या सरांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यांनी तिच्यावर दाखवलेला विश्वास साक्षीने सार्थ ठरवला. त्यातूनच हे यश मिळाले.”
साक्षीची आई पूनम चांडक यांनीही निकालाच्या क्षणातील भावना व्यक्त केल्या. “निकाल कळल्यानंतर आम्ही दोघी एकमेकींना मिठी मारून खूप रडलो. ती देशात प्रथम आली आहे, यावर सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. मात्र, तिने दाखवलेली जिद्द आणि चिकाटी यामुळेच तिला हे यश मिळाले, असे मला वाटते,” असे त्यांनी सांगितले.
या यशासाठी साक्षीने नियोजनबद्ध अभ्यासावर भर दिला होता. ती नाशिकमधील माहेश्वरी हॉस्टेलमध्ये राहून सीएचे शिक्षण घेत होती. परीक्षेच्या तयारीसाठी अकॅडमीच्या सरांशी संवाद साधून तिने अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले होते. याबाबत साक्षी म्हणाली, “मी पहाटे पाच वाजता उठून अभ्यासाला सुरुवात करायचे. मध्ये छोटे ब्रेक घेत पुन्हा अभ्यास करायचे. दररोज बारा तास अभ्यास होईल, अशा पद्धतीने वेळापत्रक आखले होते. आयसीआय आणि एमटीपी यांचेही शेड्युल तयार करून त्यानुसार तयारी केली. या संपूर्ण प्रक्रियेत मला सरांचे योग्य मार्गदर्शन मिळाले.”


