(रायगड / वृत्तसंस्था)
अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील दांपत्याचा खोपोलीजवळील बोरघाट परिसरात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. एकविरा देवीचे दर्शन घेऊन मोटारसायकलने घरी परतणारे प्रशांत तांडेल आणि त्यांची पत्नी चैत्राली तांडेल यांचे मृतदेह सायमाळ परिसरात धनगरवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर आढळले. बराच वेळ होऊनही दांपत्य घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला होता. मागील २ दिवस दोघांचाही कुठेही ठावठिकाणा लागला नाही. पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा अपघातग्रस्त स्कुटी एका झुडपीत आढळली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत तांडेल हे पत्नीसमवेत एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते मोटारसायकलने अलिबागच्या दिशेने निघाले. मात्र, दोन दिवस उलटूनही ते घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली आणि त्यांनी दांपत्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध सुरू असताना त्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासण्यात आले. त्यावेळी शिंग्रोबा मंदिर ते सायमाळ, खोपोलीदरम्यान मोबाईलचे लोकेशन दिसून आले. त्यानुसार संबंधित परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. या शोधादरम्यान सायमाळजवळ धनगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रशांत तांडेल आणि त्यांच्या पत्नीचे मृतदेह आढळून आले. त्यांचे मोबाईल लोकेशन खोपोली सायमाळ ते शिंग्रोबा मंदिर दाखवत असल्याने खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशन यांनी शोध मोहीम सुरू केली. प्रशांत तांडेल यांची स्कुटर टाटा सायमाळ स्टाफ कॉलनीच्या सुरक्षा भिंतीवर गाडी अडकली होती.
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशनचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. दांपत्याचा अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा उलगडा तपासानंतर होणार आहे.
खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या दांपत्याचा घरी परततानाचा प्रवास दुर्दैवी ठरल्याने आक्षी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


