(अहमदाबाद )
एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानाच्या अपघातानंतर तपासाला वेग आला आहे. गुजरात एटीएसने अपघातस्थळी शोधमोहीम राबवत विमानाचा डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर (DVR) आणि ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला आहे. या दोन्ही उपकरणांमुळे अपघाताचं नेमकं कारण समजण्यास मोलाची मदत होणार आहे. यासह इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर सुद्धा सापडला असून तो ब्लॅक बॉक्स सिस्टीमचाच भाग आहे.
गुरुवारी झालेल्या या दुर्घटनेत २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने टेकऑफ घेतानाच काही मिनिटांतच कोसळले. मेघानीनगरमधील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीवर हे विमान आदळल्याने मोठी जीवितहानी झाली.
DVR व ब्लॅक बॉक्सच्या आधारे अपघाताचा तपशील समोर येणार
विमान अपघातांनंतर कारणमीमांसा करण्यासाठी डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स ही अत्यंत महत्त्वाची साधनं असतात. एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “विमानाच्या ढिगाऱ्यातून आम्ही DVR आणि ब्लॅक बॉक्स शोधून काढले असून, ते पुढील तपासासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे (FSL) सुपूर्त करण्यात येणार आहेत. या उपकरणांमुळे उड्डाणपूर्व तसेच अपघाताच्या क्षणापर्यंत घडलेल्या तांत्रिक बाबी, संवाद आणि इतर नोंदी समजून घेता येतील. यामुळे अपघाताचा नेमका क्रम आणि संभाव्य कारणं लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची घटनास्थळी पाहणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातस्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकमेव बचावलेल्या प्रवासी रमेश विश्वासकुमार यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर मोदींनी गुजरातचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विजय रुपाणी यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांना सांत्वन केले. “विजयभाई आपल्यात नाहीत, हे स्वीकारणं खूप कठीण आहे,” असे भावनिक शब्द त्यांनी यावेळी उच्चारले.
एअर इंडियाला विमानांची ‘पूर्व-उड्डाण’ तपासणी बंधनकारक
या भीषण अपघातानंतर केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलली आहेत. नागरी उड्डयन महासंचालनालय (DGCA) ने एअर इंडियाला आदेश दिले आहेत की, १५ जून २०२५ च्या मध्यरात्रीपासून भारतातून उड्डाण करणाऱ्या प्रत्येक विमानाची एक विशेष पूर्व-तपासणी प्रक्रिया अनिवार्य असेल. डीजीसीएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 15 जून 2025 पासून भारतातून उड्डाणे सुरू करण्यापूर्वी तपासणी करणे अनिवार्य आहे. यामुळे आता इंधन पॅरामीटर देखरेख, संबंधित सिस्टम तपासणी, केबिन एअर कॉम्प्रेसर आणि सिस्टम, इलेक्ट्रॉनिक इंजिन नियंत्रण-प्रणाली तपासणी, इंजिन इंधन चालित अॅक्च्युएटर-ऑपरेशनल चाचणी, हायड्रॉलिक सिस्टमची सेवा चाचणी आणि टेक-ऑफ पॅरामीटर्स तपासले जातील. गेल्या 15 दिवसांत बोईंग 787-8 आणि 7 बोईंग 787-9 विमानांमध्ये वारंवार झालेल्या बिघाडांच्या पार्श्वभूमीवर देखभालीची कारवाई शक्य तितक्या लवकर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशातच असेही म्हटले आहे की, सर्व सुरक्षा तपासणीचा अहवाल डीजीसीएकडे सूपूर्द करावा लागणार आहे.
या तपासणीमध्ये खालील बाबींचा समावेश असेल:
-
इंधन पॅरामीटर मॉनिटरिंग
-
केबिन एअर कंप्रेसर सिस्टम तपासणी
-
इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल चाचणी
-
इंजिन फ्युएल एक्चुएटर ऑपरेशन
-
ऑइल आणि हायड्रोलिक सिस्टम तपासणी
तसेच, पॉवर एश्युरन्स चेक देखील पुढील दोन आठवड्यांत अनिवार्य करण्यात आले आहे. या उपाययोजनांमुळे भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.