(पुणे)
ससून रुग्णालयाच्या मनोविकृतीशास्त्र विभागातील डॉक्टर नितीन अभिवंत (वय ४२) यांचे हिमालयातील ट्रेकिंगदरम्यान आकस्मिक निधन झाले. श्वासोच्छवासाचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यांच्यामागे आई-वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
डॉ. अभिवंत यांना गिर्यारोहणाची विशेष आवड होती. शनिवारी ते मुंबईहून हिमालयातील बुरान व्हॅली येथे महाविद्यालयीन मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. गिर्यारोहणास सुरुवात केल्यानंतरच त्यांना धाप लागणे आणि अतिशय घाम येणे अशी लक्षणे जाणवू लागली. त्यांच्या सोबत असलेल्या दोन डॉक्टर मित्रांनी तातडीने प्राथमिक उपचार (First Aid) केले, पण परिस्थिती गंभीर होत गेली. त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते.
डॉ. नितीन अभिवंत यांनी ससून रुग्णालयातील प्रशासकीय जबाबदाऱ्या अत्यंत कुशलतेने पार पाडल्या होत्या. त्यांचा राष्ट्रीय पातळीवरील अनेक उपक्रमांमध्ये आणि संशोधन प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग होता. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे त्यांच्या सहकारी डॉ. नितीन थोरात यांनी सांगितले.
ट्रेकिंगची प्रचंड आवड
डॉ. नितीन अभिवंत हे 42 वर्षाचे होते. त्यांना ट्रेकिंगची प्रचंड आवड असल्याचं सांगितलं जातंय. ट्रेकिंगसाठी ते हिमालयात गेले होते. तेथे ट्रेकिंगदरम्यान श्वासोच्छवासात अडथळा आला. त्यांना धाप लागली अन् या घटनेतच त्यांचा मृत्यू झालाय. डॉ. नितीन अभिवंत यांच्या मृत्यूमुळे सहकारी, मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीयांकडून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रुपाली आणि सात वर्षीय मुलगा आहे. त्यांची पत्नी बीजे महाविद्यालयात PSM विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे.