(दापोली)
सन २०२५–२६ च्या रत्नागिरी जिल्हा पुरस्कृत नासा–इस्रो भेट परीक्षा मध्ये जिल्हा परिषद केंद्रशाळा सुकोंडी नं. १ येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. ग्रीशा मुकेश गायकर हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
सदर परीक्षा तालुका स्तरावर घेण्यात आली असून दापोली तालुक्यातून एकूण २०४ विद्यार्थी पात्र ठरले होते. मर्यादित सोयीसुविधा असूनही ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असलेल्या ग्रीशा हिने पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवून आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.
तिला शाळेतील पदवीधर शिक्षक श्री. प्रमोद किरडवकर यांचे शैक्षणिक मार्गदर्शन तसेच केंद्र मुख्याध्यापिका सौ. जोशी मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. बालिका दिनानिमित्त सुकोंडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. दिलीप मोहिते यांनी शाळेला भेट देऊन ग्रीशाचे विशेष कौतुक करत पुढील टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल सुकोंडी पंचक्रोशीतील सर्व स्तरांतून ग्रीशावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, केंद्रातील सर्व शिक्षकवर्ग तसेच पालकांचेही तिला भक्कम सहकार्य लाभले असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

