(रत्नागिरी)
लांजा तालुक्यातील कांटे गावातील एका ३१ वर्षीय तरुणाचा विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मृत तरुणाचे नाव वैभव सुरेश सरफरे असे असून, त्याने घरात कोणतेतरी विषारी औषध प्राशन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय उपचार सुरू असतानाच २४ मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्यात नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. वैभव सरफरे यांनी विषारी औषध कोणत्या कारणाने प्राशन केले, यामागील पार्श्वभूमी आणि परिस्थितीचा शोध घेण्याचे काम सुरू असून, संबंधितांकडून माहिती संकलित केली जात आहे. या घटनेमुळे कांटे परिसरात शोककळा पसरली असून, तरुणाच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

