(लांजा/ रत्नागिरी)
तालुक्यातील बेनी बुद्रुक येथील कुसुममळेवाडीमध्ये बुधवारी रात्री घडलेल्या बिबट्याच्या धाडसी हल्ल्याने परिसर हादरून गेला आहे. रात्री सुमारे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास एका घरात घुसलेल्या बिबट्याने ५२ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला. विशेष म्हणजे, मदतीसाठी धावलेल्या १९ वर्षीय युवकालाही बिबट्याने लक्ष्य केल्याने दोघेही जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुसुममळेवाडीमध्ये बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे शांत वातावरण होते. मात्र, अचानक एका घराच्या पाठीमागील बाजूने बिबट्या घरात शिरला. घरातील सदस्यांना काही समजण्याआधीच त्याने ५२ वर्षीय व्यक्तीवर झडप घालत हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घरात एकच गोंधळ उडाला. बिबट्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्यासाठी संबंधित व्यक्तीने आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आर्त आवाज ऐकून शेजारी राहणारा १९ वर्षीय युवक मदतीसाठी तत्काळ धावून आला. मात्र, आक्रमक झालेल्या बिबट्याने त्याच्यावरही झडप घालत हल्ला केला. या दुहेरी हल्ल्यात दोघेही गंभीर स्वरूपाचे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, बिबट्याने थेट वस्तीत आणि घरात घुसून हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेच नव्हे, तर घरात राहणेही सुरक्षित राहिले नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे बेनी बुद्रुक परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. संबंधित बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

