( रत्नागिरी )
रत्नागिरी येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिणामध्ये चिपळूण तालुक्यातील बहुतांश शिक्षकांचा समावेश आहे. प्रशिक्षणाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी आणि प्रशिक्षणानंतर पुन्हा घरी येण्यासाठी शिक्षकांनी एका खासगी मिनी बस ठेवली होती. गेले आठ दिवस याच मिनी बसमधून हे सर्व शिक्षक प्रवास करत होते. मात्र, रविवारी निवळी (ता. रत्नागिरी) येथे टॅकरने मिनी बसला दिलेल्या धडकेत या शिक्षकांच्या जीवावर बेतले.
शासनातर्फे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूल आणि फाटक हायस्कूल येथे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सोमवार, २ जूनपासून या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षणात जिल्हाभरातील शिक्षक सहभागी झाले असून, चिपळूण तालुक्यातील सावर्डे, खेर्डी, दहिवली, गोवळकोट या भागातील शिक्षकांचा समावेश आहे.
या प्रशिक्षणाला वेळेत येण्याची अट घालण्यात आली आहे. प्रशिक्षणाला यायला उशीर झाला तर संबंधित शिक्षकाला प्रशिक्षणाला बसू दिले जात नाही. त्यामुळे प्रशिक्षणाला वेळेत पोहोचण्यासाठी शिक्षकांनी एका खासगी मिनी बसची व्यवस्था केली होती. या मिनी बसमधून हे शिक्षक चिपळुणातून रत्नागिरीत येत होते आणि प्रशिक्षण संपल्यानंतर पुन्हा चिपळुणात जात होते.
सोमवारी वेळेवर प्रशिक्षणाला पोहोचण्यासाठी रविवारी हे सर्व शिक्षक पुन्हा मिनी बसने रत्नागिरीत येत होते. महामार्गावरील रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे ही गाडी आली असता समोरुन येणाऱ्या गॅसवाहू टँकरने मिनी बसला धडक दिली आणि मिनी बस रस्त्याच्या बाजूला २५ ते ३० फूट खोल दरीत जाऊन उलटली. यामध्ये चालकासह ३० शिक्षक जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे.
या अपघातामुळे प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या जीवावर बेतले होते. सुदैवाने यामध्ये मोठी दुर्घटना घडली नाही. दरम्यान, जिल्ह्यात एकाच ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. तसेच कडक नियमावली नाराजी पसरली आहे.