(खेड)
कोकणात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी मनसेचे राज्य सरचिटणीस व खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी नुकतेच आपल्या सहकाऱ्यांसह येथील प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासमवेत मिलिंद नांदगावकर, मनोज दांडेकर, केदार वणजू, अक्षय जांभूळकर, रोहित भुवड, सर्वेश पवार, प्रशांत बारटक्के आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या शेतीचं अतोनात नुकसान झाले आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना भात पेरणी करता आली नाही. त्यामुळे वाफे तयार झाले नाहीत. सलगच्या पावसामुळे जून महिन्यातील पहिला आठवड्यामध्ये देखील पेरण्या झाल्या नाहीत. धुळ वाफेवरच्या पेरण्या ह्या तात्काळ रुजवा होऊन वाफे तयार होतात, परंतु बदलत्या हवामानामुळे सर्व शेती पाण्याखाली गेल्यामुळे आता शेतीच्या पेरण्या आणि उगवणाऱ्या वाफे आणि होणारे उत्पन्न हे कमी प्रमाणात होणार आहे. सबब हे आमच्या कोकणातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आहे.
तरी आपण शासन दरबारी होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून कोकणातील शेतक-यांना आर्थिक मदत होईल अशा पद्धतीचा प्रस्ताव आपल्या हातून शासन दरबारी सादर करावा अशी विनंती करण्यात आली आहे. अन्यथा कोकणाला कोणीच वाली नाही. हे आम्ही गृहीत धरून सर्व शेतकऱ्याना घेऊन आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी,असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

