(गुहागर)
गुहागर पोलीस ठाण्याच्या कार्यकुशलतेमुळे मंदिरातील चोरीचा गुन्हा अवघ्या चार तासांत उघडकीस आला असून, पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेत १००% मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलिसांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
दिनांक २ जून २०२५ च्या मध्यरात्री, गुहागर पोलीस ठाणे हद्दीतील कोतळूक गावातील श्री हनुमान मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा अज्ञात इसमाने उचकटून तेथील लाकडी दानपेटी चोरून नेली. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा क्रमांक ४०/२०२५ दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण श्री. राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी विशेष पथक तयार केले. गोपनीय माहिती आणि मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीसांनी आरोपी सौरभ संतोष कदम (रा. मळण रोड, शृंगारतळी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) याची ओळख पटवली आणि अवघ्या चार तासांत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण दानपेटी जप्त करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू असून, यापूर्वी त्याने अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत काय, याचीही चौकशी सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री. सुजीत सोनावणे, म.पो.ना स्वामिनी नाटेकर, पोकों वैभव चौगले, पोकों प्रतिक रहाटे, पोकॉ प्रथमेश कदम, पोकॉ निखील पाटील, म.पोकॉ सिमा मोरे आदीचा समावेश आहे. मात्र गुहागर पोलिसांची ही जलद कारवाई परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.