( मुंबई )
राज्य सरकारकडून हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या निषेधार्थ, सोमवार, १४ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रभरातील २०,००० हून अधिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती असोसिएशन ऑफ होटेल्स अँड रेस्टॉरंट्स (AHAR) संघटनेचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांनी दिली.
करवाढीमुळे उद्योग संकटात
गेल्या एका वर्षात हॉस्पिटॅलिटी उद्योगावर सलगपणे तीन प्रकारच्या करांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे:
- मद्यावरील व्हॅट (VAT) : ५% वरून १०% पर्यंत वाढ
- परवाना शुल्क : १५% वाढ
- मद्यावरील उत्पादन शुल्क : थेट ६०% वाढ
या तिहेरी वाढीमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर मोठा आर्थिक ताण आला असून, अनेक ग्राहकही दूर गेले आहेत. “अशी स्थिती राहिल्यास उद्योग बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही,” अशी खंत शेट्टी यांनी व्यक्त केली.
सरकारकडे वारंवार मागण्या पण प्रतिसाद नाही
AHAR संघटनेने याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे वेळ मागून करसवलतीची मागणी केली होती. तसेच, वाढीव कर रद्द करण्याबाबत निवेदनेही सादर करण्यात आली होती. मात्र, सरकारकडून कोणतीही ठोस कृती वा प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर बंदचा निर्णय घेण्यात आला. हा बंद केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण आणि मराठवाडा या भागांतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सही सहभागी होणार आहेत. संघटनेने स्पष्ट केलं आहे की, “हा बंद शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडला जाईल.”
या बंदमुळे सोमवार, १४ जुलै रोजी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधून अन्नसेवा ठप्प राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि ग्राहकांनी पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असं आवाहन संघटनेकडून करण्यात आलं आहे.