(लांजा / वार्ताहर)
गणेशोत्सवाला अवघे चार दिवस शिल्लक असतानाच लांजा शहरातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही लेनमधून वाहतूक सुरू झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची मोठी सोय झाली आहे. आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उड्डाणपुलाचा रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ रखडले होते. त्यामुळे शहरातील नागरिकांना तसेच महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. उड्डाणपुलाचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. गणेशोत्सव जवळ आल्याने आणि पुलाचे काम वेगाने सुरू असल्यामुळे तो लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर २० ऑगस्ट रोजी उड्डाणपुलावरून मुंबई ते गोवा दिशेने जाणारी एकेरी वाहतूक प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पुढील काही दिवसांत पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक सुरू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी उड्डाणपुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली होती.
मात्र, गणेशोत्सवापूर्वी दोन्ही लेन वाहतुकीसाठी सुरू व्हाव्यात यासाठी आमदार किरण सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा आणि प्रयत्न केले. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून लांजा शहरातून जाणारा उड्डाणपूल आता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दोन्ही लेन सुरू झाल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांना, विशेषतः गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे लांजा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनधारक त्रस्त झाले होते. उड्डाणपूल सुरू झाल्याने वर्षानुवर्षे कायम असलेली ही वाहतूक कोंडीची समस्या आता दूर झाली आहे.
विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे आणि पालघर भागातून कोकणात येणाऱ्या लाखों चाकरमान्यांच्या प्रवासासाठी उड्डाणपूल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास अधिक वेगवान आणि खड्डेमुक्त तसेच सुखकर होणार आहे. आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण आणि यशस्वी पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.


