(संगमेश्वर)
तालुक्यात कडवर्ड येथील ग्रामदेवता मंदिराजवळ बुधवारी (२९ मे) सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास विजेची तार तुटून अंगावर पडल्याने कोंडू बिरू जांगळी यांच्या मालकीची गाभण म्हैस जागीच दगावली. या दुर्दैवी घटनेत जांगळी यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंडू जांगळी आपल्या गुरांबरोबर कडवर्ड येथील ग्रामदेवतेच्या मंदिराजवळून जात होते. त्याच वेळी अचानक विजेची एक झाडाला लागलेली वायर तुटून त्यांच्या गाभण म्हशीवर पडली. विजेचा तीव्र शॉक बसल्यामुळे म्हैस तडफडू लागली आणि काही क्षणांतच मृत्युमुखी पडली. अंधार असल्यामुळे जांगळी यांना तुटलेली वायर दिसली नाही; मात्र प्रसंगावधान राखत ते वेळीच मागे सरकल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच तुरळ शाखेचे कनिष्ठ अभियंता वीरेंद्र सकपाळ आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व वीजप्रवाह खंडित करून पाहणी केली. गुरुवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चारुदत्त बेलुरे यांनी मृत म्हशीचे शवविच्छेदन केले. यानंतर ग्राम महसूल अधिकारी विठ्ठल सराई, उपसरपंच दत्ताराम ओकटे, पोलीस पाटील संजय ओकटे आणि अभियंता वीरेंद्र सकपाळ यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
या पंचनाम्यात शेतकऱ्याचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले असून, स्थानिक नागरिकांकडून कोंडू जांगळी यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.