(खेड)
तालुक्यातील कोरेगाव–संगलट रस्त्यावर गुरुवारी घडलेल्या धक्कादायक घटनेत तब्बल २५ शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. भरधाव वाळू डंपरने एसटी बसला धडक दिल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखून बस दरीत कोसळण्यापासून रोखली. या घटनेनंतर पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
अपघात नेमका कसा घडला?
खेड आगारातून सुटणारी एसटी बस पहाटे ६ वाजता नेहमीप्रमाणे शेरवली वस्तीवरून शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना घेऊन संगलट–कोरेगाव मार्गे खेडकडे जात होती. कर्जी गावाजवळ अचानक भरधाव वाळूचा डंपर समोरून आला आणि त्याने एसटीला जोरदार धडक दिली. अपघात टाळण्यासाठी एसटी चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली. मात्र, त्या ठिकाणी केबल टाकण्यासाठी खोदलेला खड्डा असल्याने बस त्या चरात अडकली. काही फुटांच्या अंतरावरच ५० फूट खोल दरी होती. परंतु चालकाच्या तात्काळ निर्णयामुळे आणि दैव बलवत्तर ठरल्याने मोठा अपघात टळला.
विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका, पालकांमध्ये संताप
या बसमध्ये २० ते २५ विद्यार्थी प्रवास करत होते. ही घटना केवळ थरकाप उडवणारी नव्हे, तर प्रशासनाच्या बेपर्वाईचे स्पष्ट उदाहरण आहे, अशी जोरदार टीका ग्रामस्थ आणि पालकांकडून करण्यात येत आहे. दापोली तालुक्यातील कर्जीतून मोठ्या प्रमाणात चोरटी वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती असून, नागरिकांनी वेळोवेळी महसूल आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. तरीदेखील डंपर खुलेआम धावत आहेत, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
आता कारवाई होणार का?
आजचा अपघात टळला असला तरी उद्या याच रस्त्यावर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन डंपर वाहतुकीवर तातडीने अंकुश आणावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

