(पुणे)
शिरूर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळ रांजणगाव गावाच्या हद्दीत मानवी संवेदना हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका सुमारे २५ ते ३० वयोगटातील महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलांचा—चार वर्षांचा मुलगा व दीड वर्षांची मुलगी—असे तीन अर्धवट जळालेले मृतदेह आढळून आले आहेत. या तिघांचा क्रूरपणे खून करून त्यांचे मृतदेह पेटवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळाचा तपशील व पोलिसांची कारवाई
ही भीषण घटना रांजणगाव गणपती – खंडाळा माथा परिसरात, पुणे-अहिल्यानगर हायवेजवळील ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस घडली. मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले आहे. मात्र, प्राथमिक तपासात महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असे गोंदलेले टॅटू आढळून आले असून, त्यामुळे तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी घटनास्थळाला भेट देत तपास अधिक जलद आणि कठोर करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस तपास आणि पंचनामा
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, एसआय गुलाब येळे, महिला अधिकारी सविता काळे, तसेच स्थानिक पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी यांनी तत्काळ पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आहेत. घटनास्थळी श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकाची मदत घेऊन तपास सुरू आहे.
हे हत्याकांड कोणी आणि कोणत्या कारणावरून केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी श्वान पथकाने ही माग घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असुन या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रांजणगाव पोलीस स्थानकाकडून परिसरातील नागरिकांना विशेष आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी परिसरातील नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. “कोणतीही अलीकडील काळात बेपत्ता झालेली महिला किंवा लहान मुले, भाडेकरू अथवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी तात्काळ रांजणगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधावा,” असे त्यांनी स्पष्ट केले.