आपण कधी ना कधी उपचारासाठी डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर रुग्णांच्या तक्रारी ऐकून प्रिस्क्रिप्शन लिहितात; मात्र अनेकवेळा हे प्रिस्क्रिप्शन इतके अस्पष्ट आणि खराब हस्ताक्षरात असते की रुग्ण तर सोडाच, अनेकदा फार्मासिस्ट आणि वैद्यकीय व्यावसायिकांनाही ते समजणे कठीण जाते. ही समस्या वर्षानुवर्षे सुरू असल्याने रुग्णांनीही ती गृहीत धरली होती. मात्र आता हे चित्र बदलणार आहे.
अस्पष्ट प्रिस्क्रिप्शनमुळे चुकीची औषधे, चुकीचा डोस आणि गंभीर आरोग्यधोके निर्माण होण्याच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. विशेषतः वृद्ध आणि गंभीर आजारी रुग्णांसाठी ही समस्या अधिक धोकादायक ठरत होती. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि न्यायालयांनीही या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष दिले.
ऑगस्ट २०२५ मध्ये पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या अस्पष्ट प्रिस्क्रिप्शनवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने स्पष्ट केले की, भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत स्पष्ट प्रिस्क्रिप्शन मिळणे हा आरोग्याचा मूलभूत अधिकार आहे. अस्पष्ट प्रिस्क्रिप्शनमुळे चुकीचे उपचार होऊ शकतात आणि रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असेही न्यायालयाने नमूद केले.
या निर्णयानंतर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) डिसेंबर २०२५ मध्ये सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसाठी नवीन आणि कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार,
- डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन स्पष्ट आणि वाचण्याजोग्या हस्ताक्षरात लिहावे
- औषधांची नावे मोठ्या अक्षरात आणि शक्य असल्यास जेनेरिक नावांनी लिहावीत
- अस्पष्ट प्रिस्क्रिप्शन स्वीकारले जाणार नाहीत
एनएमसीने स्पष्ट केले आहे की, अस्पष्ट प्रिस्क्रिप्शनमुळे रुग्णांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण होतो. हे नियम आधीही अस्तित्वात होते; मात्र आता त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
तसेच, सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना औषध आणि थेरपी समिती अंतर्गत उपसमित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या समित्या नियमितपणे प्रिस्क्रिप्शन तपासतील, चुका ओळखतील आणि सुधारणा सुचवतील. याशिवाय, वैद्यकीय अभ्यासक्रमात स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिण्याचे प्रशिक्षण क्लिनिकल शिक्षणाचा अनिवार्य भाग करण्यात येणार आहे.
या नव्या नियमांमुळे रुग्णांना स्पष्ट, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार मिळतील. औषधांच्या चुका कमी होतील, डॉक्टर अधिक सतर्क राहतील आणि भविष्यातील डॉक्टरांना अधिक दर्जेदार प्रशिक्षण मिळेल. एकूणच, या मार्गदर्शक तत्त्वांमुळे आरोग्यसेवेत पारदर्शकता आणि रुग्णांची सुरक्षितता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

