(खेड)
खेड तालुक्यातील खोपी फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची तक्रार दाखल झाल्याने शनिवारी सायंकाळी खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही संपूर्ण घटना बनावट असल्याचे उघड झाले असून, संबंधित तक्रारदाराने स्वतःच्या अपघाताचे खापर इतरांवर फोडण्यासाठी हा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरोधात खोटी माहिती देणे व पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, तक्रारदार व एका अनोळखी मोटारसायकलस्वारामध्ये वाद झाला होता. या वादात बाचाबाची आणि शिवीगाळ झाल्यानंतर मोटारसायकलस्वाराने तक्रारदाराच्या गाडीवर दगड फेकून काच फोडली आणि निघून गेला. प्रत्यक्षात कोणताही गोळीबार झाला नसतानाही, तक्रारदाराने भावाला फोन करून “मला गोळी लागली आहे” असे सांगितले आणि डायल 112 वरही याची खोटी माहिती दिली.
विशेष म्हणजे, याआधीही या तक्रारदाराने अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्या घटनेतीलही चौकशीत कोणतेही तथ्य आढळले नव्हते आणि ती तक्रार खोटी ठरवून बंद करण्यात आली होती. त्यामुळे या व्यक्तीचा हेतुपूर्वक खोटा आरोप करण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
खोटी माहिती देऊन पोलिसांचा वेळ व संसाधने वाया घालवणाऱ्या तक्रारदाराविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून, भविष्यात अशा खोट्या तक्रारींना आळा बसावा यासाठी कडक कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.