(खेड)
तालुक्यातील आंबडस बौद्धवाडी येथे बाथरूमची कडी बदलल्याच्या कारणावरून एका ४९ वर्षीय पुरुष आणि त्याच्या ४५ वर्षीय पत्नीला बेदम मारहाण केल्याची तसेच महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना ११ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात सीमा उमेश चंपलोन (रा. वरळी, मुंबई) यांनी तक्रार दाखल केली असून, आरोपी रमेश काशीराम हळदे, विजय काशीराम हळदे, रंजन रमेश हळदे आणि प्रफुल्ल महेंद्र साळुंखे (सर्व रा. आंबडस बौद्धवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, उमेश चंपलोन यांनी आपल्या वैयक्तिक बाथरूमची कडी बदलल्यावरून वाद निर्माण झाला. संतप्त रमेश हळदे व अन्य तिघांनी चंपलोन दाम्पत्याला मारहाण केली. तसेच खिडक्यांच्या काचा फोडून घरातील वस्तूंची तोडफोड केली आणि उमेश चंपलोन यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाणीत उमेश चंपलोन यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.
घटनेवेळी पत्नी सीमा चंपलोन मदतीस धावल्या असता, त्यांनाही मारहाण करून विनयभंगाचा प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेबाबत पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.