(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गणपतीपुळे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. या दहीकला उत्सवाच्या निमित्ताने मालगुंड गणपतीपुळे परिसरात उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी परिसरातील स्थानिक गोविंदा पथकानी हजेरी लावली होती. या गोविंदा पथकांनी सुमारे चार ते पाच थरापर्यंतच्या दहीहंड्या फोडून दहीकाला उत्सवाचा आनंद लुटला.
या दहीकला उत्सवाचे मालगुंड येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात आयोजन मालगुंड भंडारवाडा येथील भंडारी समाज मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या भंडारी समाजाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी मालगुंड येथील गोपालकृष्ण मंदिरात १५ रोजी रात्री मोठ्या भक्ती भावात साजरी करण्यात आली. त्यानंतर आज (१६ रोजी) दहीकाला उत्सव साजरा करताना मालगुंड भंडारी समाजाच्यावतीने तसेच कुणबी समाज हितवर्धक मंडळ आणि मालगुंड बाजारपेठेतील व्यवसायिक दुकानदारांकडून मालगुंड बाजारपेठेत सुमारे 20 ते 25 दहीहंड्या उभारण्यात आल्या आहेत. सुमारे चार ते पाच थरापर्यंतच्या या दहीहंड्या फोडण्याचा मान मालगुंड येथील गोपाळकृष्ण गोविंदा पथक आणि कुणबी समाज हितवर्धक समाज मंडळाच्या गोविंद पथकाने पटकावला. तसेच निवेंडी परिसरातील पुरुष व महिला गोविंदा पथकानीही या दहीकाला उत्सवात हजेरी लावून सुमारे ५ थरापर्यंतच्या दहीहंड्या फोडण्यासाठी आपली सलामी देऊन दहीकाला उत्सवात रंगत आणली.
या दहीकाला उत्सवात मालगुंड येथील भंडारी समाजाच्या वतीने आकर्षक सजावटीद्वारे बैलगाड्या सजवून त्यामध्ये श्रीकृष्ण जीवन चरित्रावर आधारित विविध चित्ररथ तयार केले होते. यावेळी बैलगाड्यांमध्ये वेशभूषेत सजलेल्या बालगोपाळांनी गोविंदा प्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले. तसेच या दहीकाला उत्सवात श्रीकृष्णाची पालखी मिरवणूक ही वाजत गाजत काढण्यात आल्याने अनेकांनी श्रीकृष्ण पालखीच्या दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी मोठ्या संख्येने मालगुंड मालगुंड बरोबरच नजीकच्या गणपतीपुळे व निवेंडी परिसरातील परिसरातील ग्रामस्थ दहीकाला उत्सवात सहभागी झाले होते.

