(रत्नागिरी /!प्रतिनिधी)
महामार्गावरील पाली ते बावनदी भागातील महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, खड्ड्यांनी भरलेले रस्ते आणि त्यात साचलेले पावसाचे पाणी यामुळे वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, रस्त्याचे अस्तित्वच हरवल्यासारखे वाटते. खड्ड्यांत साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना रस्ता आणि खड्ड्यात फरक करणे अशक्य झाले आहे.

या कामाची जबाबदारी ईगल कंपनीकडे देण्यात आली असली तरी कामाची गती अत्यंत संथ आहे. महिन्यानमहिने रस्ता खोदून तसाच टाकून दिल्यामुळे लोकांना पावसाळ्यापूर्वीच नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. रस्त्याच्या कडेला ना योग्य पाटी, ना सुरक्षेची व्यवस्था; केवळ धूळधाण आणि चिखलाने रस्त्याची दुर्दशा स्पष्टपणे दिसते.
हातखंबा तिठा, निवळी या भागातून दररोज शेकडो वाहनधारक आणि कामगार प्रवास करतात. पण रस्त्याच्या दुरवस्थेकडे ना स्थानिक आमदारांचे लक्ष, ना प्रशासनाची गंभीर दखल. वाहनधारकांसह नागरिकांमध्ये यामुळे तीव्र नाराजी पसरली असून, दुसरीकडे मात्र प्राधिकरण अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

आता तरी प्रशासन जागं होणार का?
निवळीसह हातखंबा तिठा परिसरातील ही खड्डेबाज अवस्था केवळ वाहतुकीला अडथळा नाही, तर अपघातांना निमंत्रण आहे. पावसाळा तोंडावर असताना, अजूनही जर संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर भविष्यात या दुर्लक्षाची मोठी किंमत जनतेला मोजावी लागणार आहे. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

