(देवरुख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदायाची सभा बुधवारी कळंबस्ते येथे पार पडली. पाऊस असतानाही वारकऱ्यांनी या सभेसाठी मोठी हजेरी लावली होती. या सभेत सर्वानुमते मुरादपूर येथील ह.भ.प. रमेश बांडागळे यांची संप्रदायाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सुरुवातीला करंडे गुरुजी यांनी सर्वांचे स्वागत केले. मावळते उपाध्यक्ष ह. भ. प. रमेश बांडागळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. करंडे गुरुजी यांनी खर्चाचे वाचन केले. सभेने त्याला मान्यता दिली. संप्रदायाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून ह.भ.प. रमेश बांडागळे यांची निवड करण्यात आली, तसेच ह.भ.प. नंदकुमार लिंगायत यांची उपाध्यक्ष म्हणून, ह.भ.प. संजय कानाल यांची सचिव म्हणून, तर करंडे गुरुजी यांची खजिनदार म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
या वेळी ह.भ.प. कांबळे महाराज, ह.भ.प. गोपाळ महाराज, ह.भ.प. काजवे महाराज, ह.भ.प. बाचिम महाराज, ह.भ.प. प्रकाश करंडे, नितीन थेराटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश सनगरे यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. प्रकाश सुवारे यांनी भोजनाची व्यवस्था केली होती. संजय कानाल यांनी सर्वांचे आभार मानले.