(दापोली)
पन्हाळदुर्ग येथील होळेश्वर देवस्थान आणि नवतरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी समाजाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना गौरवण्यासाठी पुरस्कार वितरण केले जाते. याच उपक्रमाअंतर्गत ‘गुरूवर्य हरिश्चंद्र म. जाधव स्मृती समाजभूषण पुरस्कार’ यावर्षी दापोलीचे लोकनेते किशोरभाई देसाई यांना प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
किशोरभाई देसाई हे गेली ४२ वर्षे निस्वार्थ भावनेने जनतेची सेवा करत आहेत. सामाजिक न्यायासाठी सतत कार्यरत असलेल्या देसाई यांनी वंचित आणि गरजू घटकांसाठी रुग्णसेवा, मदतकार्य आणि लोकहिताचे अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना यंदा वर्षातील दुसऱ्यांदा ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना किशोरभाई देसाई म्हणाले, “हा पुरस्कार केवळ माझा नाही, तर माझ्या परिवाराचा आणि मला नेहमीच साथ देणाऱ्या जनतेचा आहे. समाजकार्य करण्यासाठी हीच खरी प्रेरणा आहे. ही जनतेने दिलेली कौतुकाची थाप असून, या सन्मानामुळे माझ्या कार्याला नवी ऊर्जा मिळेल.”
या वेळी प्रमुख उपस्थितीत शिवसेना संपर्कप्रमुख प्रवीण लाड, होळेश्वर मंडळाचे ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र उत्तेकर, उपाध्यक्ष विलास जाधव, पोलीस पाटील बाळकृष्ण जाधव, आर्यन आंबडसकर, संदीप देसाई, शिरीष देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवतरुण मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने ग्रामस्थ बंधू-भगिनींनी या सोहळ्याला उपस्थित राहून पुरस्कारप्राप्त व्यक्तिमत्वाचे अभिनंदन केले.

