(मुंबई)
२०२० साली संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबईत नव्याने काही रुग्णांची नोंद झाली असून, उपचारादरम्यान दोन रुग्णांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे करोनाच्या संभाव्य नव्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईत आतापर्यंत ८ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आता बॉलिवूडमधूनही चिंता वाढवणारी बातमी आली आहे. ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस १८ मधून पुन्हा चर्चेत आलेल्या शिल्पा शिरोडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.
शिल्पा शिरोडकर यांनी स्वतः आपल्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात,
“हॅलो मित्रांनो, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कृपया सुरक्षित रहा आणि मास्क घाला.” त्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त करत त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बिग बॉस १८ मध्ये शिल्पा शिरोडकर या टॉप स्पर्धकांपैकी एक होत्या आणि त्यांचे काम चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले होते. त्यांच्या आजाराच्या बातमीनंतर सोशल मीडियावर अनेकांनी कोरोनाच्या पुनरागमनाबाबत आश्चर्य व्यक्त केले असून, मास्क वापरण्याचे आवाहन पुन्हा एकदा जोर धरत आहे.
दरम्यान, केईएम रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या १३ वर्षीय मुलीचा आणि ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नव्हे तर इतर गंभीर आजारामुळे झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
१३ वर्षीय मुलगी मूत्रपिंडाच्या आजाराने तर ५९ वर्षीय महिला कर्करोगाने त्रस्त असल्याने दाखल केले होते. दोघींचाही मृत्यू त्यांच्या मूळ आजारांमुळे झालेले आहेत, असे केईएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले.
मृत रुग्णांवर मूत्रपिंड व कर्करोगाचे उपचार सुरू होते. तिच्या मृत्यूचे कारण मृत्यू प्रमाणपत्रात ज्या आजारावर उपचार सुरू होते. त्याच आजाराने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. उपचारादरम्यान आम्ही सर्व तपासणी करतो त्यातच आम्ही कोविडची देखील तपासणी केली होती, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करताना कोविडचा प्रोटोकॉल पाळत त्यांना मृतदेह कोविड बॅगमधून देण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
कोरोनाचा धोका होऊ शकतो, हे लक्षात घेता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, मास्क वापरावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

