भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठींबा दिल्यामुळे भारतात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. प्रारंभी भारतीय पर्यटकांनी तुर्कीच्या पर्यटनावर बहिष्कार टाकला, तर व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून येणाऱ्या वस्तूंची आयात थांबवली. आता याच लाटेचा परिणाम देशातील शिक्षण क्षेत्रातही दिसून येत आहे.
भारतातील अनेक प्रमुख शैक्षणिक संस्थांनी तुर्कीतील विद्यापीठांशी असलेले शैक्षणिक करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), दिल्ली विद्यापीठ (DU), जामिया मिलिया इस्लामिया (JMI) आणि छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ (CSJMU), कानपूर या आघाडीच्या संस्थांनी तुर्कीच्या विविध विद्यापीठांशी असलेले सामंजस्य करार (MoUs) रद्द केले आहेत.
JNUचा ठोस निर्णय
बुधवार, १४ जानेवारी रोजी, जेएनयूने तुर्कीतील इनोनू विद्यापीठाशी असलेला शैक्षणिक करार रद्द केला. विद्यापीठाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, “राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव जेएनयू आणि इनोनू विद्यापीठ, तुर्की यांच्यातील सामंजस्य करार पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आला आहे.” मालत्या (तुर्की) येथील इनोनू विद्यापीठाने आंतरसांस्कृतिक संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाणीसाठी ही भागीदारी सुरू केली होती. मात्र आता JNUने देशाच्या हितासाठी हा करार थांबवला असून, “JNU देशाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असा स्पष्ट संदेश दिला आहे.
जामिया मिलिया इस्लामियाचा निर्णय
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने देखील राष्ट्रीय सुरक्षा आणि वर्तमान भू-राजकीय पार्श्वभूमीचा विचार करून तुर्कीशी असलेले सर्व शैक्षणिक करार तात्काळ प्रभावाने स्थगित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “तुर्की प्रजासत्ताक सरकारशी संलग्न कोणत्याही संस्थेशी असलेले सर्व एमओयू पुढील सूचना मिळेपर्यंत निलंबित करण्यात येत आहेत. जामिया मिलिया इस्लामिया देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत आहे.”
छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठाची कारवाई
कानपूरमधील छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठाने इस्तंबूल विद्यापीठाशी असलेला पूर्वीचा करार तात्काळ रद्द केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनय पाठक यांनी इस्तंबूल विद्यापीठाला पत्र पाठवून ही माहिती दिली असून, “तुर्कीने पाकिस्तानच्या समर्थनार्थ घेतलेल्या भूमिकेमुळे हा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, “भारताच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला आव्हान देणाऱ्या देशाशी शैक्षणिक संबंध ठेवणे योग्य नाही.”
शैक्षणिक सहकार्य थांबवले
या सर्व संस्थांनी तुर्कीतील विद्यापीठांसोबत शैक्षणिक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या परस्पर सहकार्याचे करार केले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत, देशहित डोळ्यासमोर ठेवून या प्रतिष्ठित संस्थांनी तुर्कीसोबतचे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
…तरी पाकिस्तानला मदत करतच राहणार, तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या नुकसानीचा विचार न करता तुर्की पाकिस्तानला मदत करतच राहणार असल्याचे म्हणत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, “पाकिस्तान आमचा भाऊ आहे, आम्ही त्याच्या मदतीला नेहमी धावू.” त्यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
याआधी केलेल्या एका ट्विटमध्येही त्यांनी म्हटले होते की, “पाकिस्तानमधील आमच्या बंधुभावांच्या लोकांसोबत आम्ही सदैव उभे राहू.” द्वेष किंवा राजकीय तोल सांभाळण्याऐवजी तुर्कस्तानकडून आता पाकिस्तानला छुप्या मदतीऐवजी उघड पाठिंबा दिला जात आहे. या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया देत तुर्कस्तानचे आभार मानले आहेत.