(पुणे / वृत्तसंस्था)
पुणे शहरात पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५ लाख ६४ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कलर प्रिंटर आणि संगणकीय साहित्यही पोलिसांनी हस्तगत केले आहे. या रॅकेटचे सातारा, कोल्हापूर आणि मुंबईशी संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे.
विशाल विलास गलांडे, सलमान जैनुद्दीन राजे, शाफाज फिरोज अन्सारी आणि अभिजित रावसाहेब कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस अंमलदार सचिन अहिवळे आणि शैलेश सुर्वे यांना महात्मा फुले मंडई परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंडईच्या मागील बाजूस म्हसोबा मंदिरासमोरील रस्त्यावर सापळा रचला.
या कारवाईदरम्यान सलमान जैनुद्दीन राजे याला ताब्यात घेण्यात आले. त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या ८०५ बनावट नोटा आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. या चौकशीत त्याने गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य तीन साथीदारांची नावे सांगितली.
यानंतर पोलिसांनी सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने पथके रवाना केली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने विशाल गलांडे आणि अभिजित कांबळे यांना शिरोळ येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण जप्त करण्यात आले. यामध्ये कलर प्रिंटर, मॉनिटर, सीपीयू, की-बोर्ड आणि माऊस यांचा समावेश असून, या साहित्याची किंमत २१ हजार रुपये आहे.
दरम्यान, आरोपी शाफाज फिरोज अन्सारी याच्या घराची तपासणी केली असता, पाचशे रुपयांच्या आणखी ३२३ बनावट नोटा पोलिसांच्या हाती लागल्या. या सर्व कारवाईत एकूण ५ लाख ६४ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचे सातारा, कोल्हापूर आणि मुंबईशी असलेले संबंध लक्षात घेऊन पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


