(लांजा / रत्नागिरी)
सलग पाच-सहा महिने वीजमीटरचे रीडिंग न घेणे, प्रत्यक्ष वीजवापराऐवजी भरमसाठ सरासरी बिले पाठविणे आणि त्यानंतर मीटर नादुरुस्त असल्याचे कारण देत स्मार्ट मीटर बसविण्याचा आग्रह धरणे, या महावितरणच्या कथित कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. वीजग्राहकांची आर्थिक पिळवणूक थांबवून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, सदोष बिले दुरुस्त करावीत आणि ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अशी मागणी पक्षाने केली आहे. तालुकाप्रमुख युवराज हांदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
रीडिंगविना बिले, ग्राहकांना मनस्ताप
लांजा तालुक्यातील अनेक भागांमध्ये गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वीजमीटरचे रीडिंग घेतले जात नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत आहेत. परिणामी, प्रत्यक्ष वीजवापराशी ताळमेळ नसलेली मोठ्या रकमेची सरासरी बिले ग्राहकांना मिळत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. या बिलांबाबत तक्रार केल्यानंतर काही प्रमाणात कपात केली जाते; मात्र त्याचवेळी संबंधित मीटर नादुरुस्त असल्याचे सांगून नवीन मीटरसाठी अर्ज करण्यास भाग पाडले जात असल्याचा दावाही पक्षाने केला आहे.
वेळेत आणि अचूक मीटर रीडिंग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिल आकारणे, तसेच चुकीची बिले दुरुस्त करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. असे असताना बिलातील त्रुटी दूर करून घेण्यासाठी ग्राहकांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे का झिजवावे लागतात, असा सवाल हांदे यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे सामान्य ग्राहकांना आर्थिक भुर्दंडासोबतच मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
२२०० मीटर नादुरुस्त असल्याचा दावा; तपासणी अहवाल कुठे?
तालुक्यात तब्बल २२०० वीजमीटर नादुरुस्त असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असल्याचे सांगत शिवसेनेने या आकडेवारीच्या आधारावर प्रश्न उपस्थित केले. इतक्या मोठ्या संख्येने मीटर नादुरुस्त असल्याचा निष्कर्ष कोणत्या तांत्रिक निकषांवर काढण्यात आला? संबंधित मीटरची प्रत्यक्ष तपासणी कोणी केली? तपासणीचे लेखी अहवाल उपलब्ध आहेत का? तसेच या तपासणीचे निष्कर्ष ग्राहकांना कळविण्यात आले आहेत का? असे प्रश्न शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांसमोर मांडले.
प्रत्येक संशयित मीटरची नियमानुसार तपासणी करून त्याबाबतचा निष्कर्ष ग्राहकांना लेखी स्वरूपात द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. मीटर खरोखरच नादुरुस्त असल्याचे अधिकृत तपासणीत स्पष्ट झाल्यास संबंधित नियमांनुसार पुढील कार्यवाही करावी; मात्र या प्रक्रियेच्या आडून स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अशी भूमिका शिवसेनेने घेतली.
स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून संघर्षाचा इशारा
ग्राहकांच्या संमतीशिवाय जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर मार्गाने दाद मागण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला. अशा प्रकाराला पक्षाकडून विरोध केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. वीजग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही. केवळ आश्वासने देण्याऐवजी चुकीची बिले दुरुस्त करणे, मीटरच्या स्थितीबाबत पारदर्शक माहिती देणे आणि तक्रारींचे वेळेत निराकरण करणे आवश्यक असल्याचे पक्षाने अधोरेखित केले.
महावितरणच्या कथित अनियमिततेबाबत सविस्तर चौकशी करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करत शिवसेनेने प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले. त्यामुळे आता महावितरण प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन कोणती पावले उचलते, याकडे लांजा तालुक्यातील वीजग्राहकांचे लक्ष लागले आहे.
या वेळी तालुकाप्रमुख युवराज हांदे यांच्यासह विभागप्रमुख लक्ष्मण मोर्ये, उपशहरप्रमुख प्रकाश ऊर्फ बाबू गुरव, सागर वायंगणकर, उपविभागप्रमुख राजेंद्र सुर्वे, जितेंद्र कदम, शांताराम गुरव, अल्लादिन नेवरेकर, बाबा धावणे, दिनेश गुरव, विघ्नेश गुरव, दामोदर खामकर यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.


