(रत्नागिरी)
रत्नागिरीतील एसटी महामंडळाच्या नवीन बसस्थानकासमोर आज (मंगळवार) दुपारी भीषण अपघात झाला. बसस्थानकात येणाऱ्या एसटी बसने एका वृद्धाला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या वृद्ध प्रवाशाचे नाव कमलाकर बाबाजी चव्हाण (वय ८२, रा. चव्हाणवाडी, जुवे, रत्नागिरी) असे आहे. ते सकाळी रत्नागिरी बाजारपेठेत आले होते आणि जवळच्या मेडिकल दुकानातून औषधे घेऊन घराकडे परतत असताना नवीन एसटी डेपोत प्रवेश करत होते.
याच दरम्यान, बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या एसटीने त्यांना धडक दिली. धडक दिल्यानंतर बसच्या मागील चाकाखाली ते आल्याने त्यांचे दोन्ही पाय चिरडले गेले. घटनास्थळीच ते गंभीर जखमी झाले होते. तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एसटी चालक बापू कोंड्या आखाडे (रा.जाकादेवी, रत्नागिरी) विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.