(गणपतीपुळे / वैभव पवार)
नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असतानाही नागरिकांना नियमितपणे आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत कोल्हापूर विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी समाधान व्यक्त केले. रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन विविध आरोग्य सेवा, दैनंदिन कामकाज आणि आरोग्यविषयक अभिलेखांची सर्वांगीण पाहणी केली.
या पाहणीदरम्यान डॉ. माने यांनी आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक उपक्रमांचा आणि सेवांचा आढावा घेतला. आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत मार्गदर्शन केले. नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असतानाही नागरिकांना आरोग्य सेवा नियमितपणे मिळत असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. प्रतिकूल परिस्थितीतही सेवा खंडित होऊ न देता कामकाज सुरू ठेवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी घेत असलेल्या मेहनतीचेही त्यांनी कौतुक केले.
या वेळी उपसंचालक कार्यालयाचे सांख्यिकी अधिकारी तेजस पारपोळकर, रत्नागिरीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शीतल सूर्यवंशी, आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर, राहुल कोकणे आणि प्रमोद लिंगायत उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार आणि डॉ. ऋषिकेश डोके यांच्यासह आरोग्य सहाय्यक राजेंद्र रणसे, LHV सीमा पाडवी, PO आस्वाद यादव, LSO स्वप्नाली किनरे, मुख्यालय ANM स्वानंदी पवार, कनिष्ठ सहाय्यक विद्या मावळणकर, गणपतीपुळे येथील MPW विक्रम जाधव, सफाई कर्मचारी शैलेश जाधव, ASHA गटप्रवर्तक आढाव, फ्लेबोटोमिस्ट श्रुतिका मोहित आणि राहुल जाधव यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यामुळे आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेण्याबरोबरच आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळाले.


