(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वाहन चालविण्याचा परवाना आणि दुचाकीचा विमा नसताना भरधाव व निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात चालकासह मागील सीटवर बसलेली तरुणी जखमी झाली. हा अपघात ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास गिरोबा चौकातील दत्त मंदिराजवळ, तेलीआळी येथे घडला. याप्रकरणी आयुष निलेश पारकर (वय २४) याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयुष पारकर हा एमएच ०३ एवाय १४९३ क्रमांकाच्या पल्सर दुचाकीवरून कु. रुणाली राजेश शिवलकर हिला मागील सीटवर बसवून जात होता. गिरोबा चौकातील दत्त मंदिरासमोरील परिसरात परशराम (बाबा) ढेकणे यांच्या घरासमोर दुचाकी आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात चालक आयुष पारकर आणि त्याच्यासोबत असलेली रुणाली शिवलकर हे दोघेही जखमी झाले. संशयित आरोपीकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे, तसेच दुचाकीचा विमाही नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. रस्त्यावरील परिस्थितीकडे लक्ष न देता निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र मोहन पारकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. अपघाताच्या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करीत आहेत.


