(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लागल्यामुळे परजिल्ह्यात बदलीसाठी उत्सुक असलेल्या शिक्षकांच्या प्रतीक्षेला आणखी वेळ लागणार आहे. जालना जिल्ह्यातील बदल्यांमध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे राज्य शासनाने ही प्रक्रिया तात्पुरती थांबवली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
दुसरीकडे, या बदल्यांना विरोध करणाऱ्या स्थानिक शिक्षकांना या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. राज्यभरातील शिक्षकांनी सरल पोर्टलवर आपली माहिती भरून प्राथमिक टप्पे पूर्ण केले आहेत. मात्र, जालना जिल्ह्यातील प्रक्रिया पारदर्शक नसल्याच्या तक्रारींचा परिणाम म्हणून अंतिम टप्पा लांबणीवर टाकण्यात आला आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. पावसाळ्यानंतरच बदली प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

