(राजापूर / तुषार पाचलकर)
ग्रामीण रुग्णालय, रायपाटण येथे आज (२४ सप्टेंबर) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात स्त्रीरोग, हृदयरोग, मधुमेह, त्वचारोग, मानसिक आजार, मूत्रपिंडाचे विकार, अस्थीरोग, हर्निया, हायड्रॉसिल, एचआयव्ही, गुप्तरोग, नेत्ररोग, गर्भाशयविकार, बालरोग आदी विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात आले. याशिवाय दंत तपासणी, मौखिक आरोग्य तपासणी, रक्तगट, लघवी, शुगर, ईसीजी आदी तपासण्यांचाही लाभ नागरिकांना मिळाला.
शिबिराचे अध्यक्षस्थान रायपाटण गावचे सरपंच निलेश चांदे यांनी भूषवले. त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “डॉ. राम मेस्त्री यांनी वैद्यकीय अधीक्षकपद स्वीकारल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध झाल्या असून, ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा लाभ होत आहे. मात्र सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध झाल्यास गरोदर महिलांना राजापूर वा रत्नागिरीला जावे लागणार नाही, यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचतील.”
वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी शिबिरार्थ्यांना आहाराविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, “जोंधळा, नाचणी आणि ज्वारीच्या भाकऱ्या रोजच्या आहारात घ्याव्यात. या धान्यांमुळे मधुमेह, रक्तदाब आणि स्त्रीरोगांवर नियंत्रण राहते. पिझ्झा, बर्गर, पॅकेट फूड, तळलेले पदार्थ व थंड पेये टाळावीत, कारण हे पदार्थ चरबी वाढवतात व हृदयरोग, डायबिटीसचा धोका वाढवतात.”
या शिबिराचा एकूण साडेतीनशेहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. या प्रसंगी उपसरपंच विजय जड्यार, उमेश पराडकर, दुर्गा तावडे, महादेव गुरव, प्रल्हाद नारकर, धनश्री मोरे, मनोज गांगण, माजी सरपंच राजेश नलावडे, प्रसाद देसाई, प्रकाश पाताडे, महादेव शिंदे, विनायक निखारंगे, कुणाल गांगण, चंद्रकांत लिंगायत, प्रदीप गांधी यांसह स्थानिक पदाधिकारी, नागरिक आणि वैद्यकीय स्टाफ उपस्थित होता.

