(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात आज (बुधवार) अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गणेश भक्तांकडून श्री चरणी आम्रफल समर्पण करण्यात आले. या आम्रफलांची श्रींचे समोर आरास संस्थान श्री देव गणपतीपुळे चे मुख्य पुजारी अभिजीत विनायक घनवटकर यांनी केली.
गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात दररोज हजारो भक्तगण स्वयंभू श्रींचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. यावेळी दर्शनासाठी आलेल्या भक्तगणांना दररोज वेगवेगळ्या उपक्रमाने आकर्षित करण्यासाठी संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागील गेल्या काही दिवसांपूर्वी आंब्यांची व द्राक्षांची सुंदर आरास श्रींच्या मूर्ती समोर करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा स्थानिक भक्तगणांकडून देण्यात आलेल्या आम्रपालांची आरास संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या वतीने बुधवारी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. ही आरास संस्थान श्रीदेव गणपतीपुळे चे मुख्य पुजारी अभिजीत विनायक घनवटकर यांनी अत्यंत आकर्षक पद्धतीने केल्याने भक्तगणांसाठी विशेष आकर्षण ठरली. दरम्यान, अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर विविध ठिकाणांहून आलेल्या भाविकांनी आम्रपालांची सुंदर आरास केलेल्या स्वयंभू श्रींच्या मूर्ती समोर मनोभावे व श्रद्धापूर्वक दर्शन घेतले.