(विशेष प्रतिनिधी)
जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात सफाई कर्मचाऱ्यांच्या नावावर २५ लाखांहून अधिक रकमेचा संभाव्य अपहार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना काळात या रकमेचा वापर सफाई कामासाठी झाला असल्याचे दाखवण्यात आले, मात्र प्रत्यक्षात निधी कोणाच्या घशात गेला, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात क्रिस्टल कंपनीचे मॅनेजर स्वप्निल पवार यांचे नाव पुढे येत असून, या कार्यकाळात कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त म्हणून संतोष चिकणे, यादव, गायकवाड कार्यरत र्होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या छत्रछायेखाली हा घोटाळा फोफावला? याचीही छाननी होणे आवश्यक आहे. “कोरोनाचा मास्क लावून चेहरा लपवणारे” कोण आहेत आणि “तपासाच्या तापाने कोण घामाघूम होणार”, हे चौकशी केल्यानंतरच स्पष्ट होईल, अशी प्रशासनामधील चर्चेला उधाण आले आहे.
चिपळूण येथील मुलांचे शासकीय वस्तीगृहात कोणताही सफाई कर्मचारी नसतानाही दीर्घकाळ पगार वितरित झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे अस्तित्वच नसताना निधी वितरित झाला असल्यास, तो नेमका कोण उचलत होता आणि कोणाच्या संमतीने, यावर आता संशयाचे मळभ गडद होत आहे. कोरोना काळात बहुतांश व्यवहार ठप्प होते, तरीही काही ठिकाणी महिन्याच्या महिन्याला मंजुरी व पेमेंट प्रक्रिया सुरूच होती, ही बाब चौकशीअंती स्पष्ट होऊ शकते.
कोणाचे चेहरे मास्कआड होते, आणि आता ताप कोणाला?
या प्रकरणात चौकशी केल्यास तत्कालीन गृहपाल, कार्यालयातील काही कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासली जाण्याची शक्यता आहे. संबंधित निधीचा उपयोग ठोसपणे दाखवता न आल्यास, आर्थिक अपहाराचे संकेत तपास यंत्रणांना मिळू शकतात.
सध्याचे सहाय्यक आयुक्तही चर्चेत
या विभागाचे सध्याचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांच्यावर यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये अनियमित निधी वाटप प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे समजते. त्या प्रकरणातही वसुलीची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केल्याचे वृत्त आहे.

