(रत्नागिरी / प्रतिनिधी)
थिबा राजा कालीन बुध्द विहाराच्या जागेसंदर्भात मोठा वाद निर्माण झाल्यानंतर दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. रत्नागिरीतील थिबा राजा कालीन बुध्द विहाराच्या जागेवर होणाऱ्या कम्युनिटी सेंटर विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मा. न्यायमूर्ती श्री. जी. एस. कुलकर्णी आणि म अद्वैत सेठना यांनी सुनावणी घेत महत्त्वाचे आदेश दिले.
याचिकेची पार्श्वभूमी: रत्नदीप काशिनाथ कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य शासन व अन्य विरोधकांविरुद्ध याचिका (नं. 5649/2025) दाखल केली होती. या याचिकेवर अॅड. मोहित दळवी यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने याचिकेतील मुद्द्यांना सार्वजनिक हिताशी संबंधित मानत यास जनहित याचिका म्हणून रूपांतर करण्याचे निर्देश दिले असून, त्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.
न्यायालयाचे ठळक आदेश:
या प्रकरणातील उत्तरदार क्र. ४ (Respondent No.4) यांच्याकडून प्रतिज्ञापत्र १२ जून २०२५पूर्वी सादर करणे बंधनकारक आहे.
2. पुढील सुनावणी होईपर्यंत संबंधित भूखंडावर status quo (जैसे थे स्थिती) राखण्याचे आदेश सर्व उत्तरदारांना देण्यात आले आहेत.
3. याचिकाकर्त्यांनी याचिकेला जनहित याचिकेत रूपांतर करण्यासाठी योग्य पावले तातडीने उचलावीत, असे निर्देश दिले.
हा आदेश भिम युवा पँथर व सर्व आंबेडकरी समाजासाठी एक मोठा विजय मानला जात आहे. समाजातील अनेक मान्यवरांनी आणि बौद्ध बांधवांनी ही चळवळ उचलून धरली होती. रत्नदीप कांबळे यांच्या धाडसी निर्णयाला आणि अॅड. मोहित दळवी यांच्या प्रभावी कायदेशीर युक्तिवादाला या आदेशामुळे न्याय मिळाला आहे. पुढील सुनावणी १२ जून २०२५ रोजी होणार आहे.
समाजाच्या ऐतिहासिक हक्कासाठी लढा देणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांचे, विशेषतः आयु. रत्नदीप कांबळे आणि आयु. दिवेन कांबळे यांचे समाजस्तरावर अभिनंदन केले जात आहे. तसेच “हा लढा फक्त पवित्र जागेच्या रक्षणासाठी नाही, तर आपल्या अस्तित्वाच्या ओळखीचा लढा आहे!” असेही म्हटले जात आहे.