(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली असून, नगराध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता नगरसेवक पदांच्या आरक्षणाची सोडत होणार आहे. बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संत गाडगेबाबा सभागृहात ही सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी दिली.
सन २०२५ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत नगर परिषदेच्या १६ प्रभागांमधून ३२ नगरसेवकांची निवड होणार आहे. या सोडतीत अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. सोडतीनंतर गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय आरक्षणाची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. आरक्षणाबाबत हरकती व सूचना नोंदविण्यासाठी ९ ते १४ ऑक्टोबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. इच्छुकांनी आपल्या हरकती अथवा सूचना संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात किंवा नगर परिषदेच्या निवडणूक कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी गारवे यांनी केले आहे.
नगरसेवक पदांच्या आरक्षणावर सर्वांचे लक्ष लागले असून, या सोडतीनंतर रत्नागिरीतील राजकीय समीकरणांमध्ये चांगलाच उलथापालथीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

