(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
शहराजनिक दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास निंदनीय प्रकार घडला. दसऱ्या निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने पथ संचलन आयोजित करण्यात आले होते. संचलनावेळी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र स्वयंसेवकांचे हे संचलन उर्दू शाळेच्या आवारात होत असल्याने हा सर्व प्रकार पाहून परिसरातील मुस्लिम बांधवांनी आश्चर्य व्यक्त केले.
मुळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सामाजिक सलोखा जपण्याची मुख्य जबाबदारी ही पोलिस यंत्रणेवर असते. अनेक वर्षापासून शांतताप्रिय, सुसंस्कृत म्हणून रत्नागिरीचे नाव आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सलोखा बिघडताना दिसून येत आहे. दरवर्षी आरएसएस संघटनेकडून पथ संचलन कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. परंतु या संचलनाची रॅलीचां मार्ग मारुती मंदिर ते टिळक आळी असा असल्याचे शहरातील काही सजग नागरिक सांगतात. मात्र पूर्वीचा संचलनाचा मार्ग बदलून यंदा दसऱ्यानिमित्त कोकणनगर नजिक कदमवाडी येथे पथ संचलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रांताधिकारी यांनी परवानगी देऊन तशी माहिती पोलिसांनाही देण्यात आली होती.
मात्र संचलनाचे आयोजित ठिकाण हे बाजूलाच राहिले, एक एक स्वयंसेवक उर्दू शाळेच्या परिसरात जमा होण्यास सुरुवात झाली. परंतु आयोजित ठिकाणी ( कदमवाडी) कार्यक्रम न घेता थेट संचलनाचा कार्यक्रम उर्दू शाळेत घेण्यात आला. हा प्रकार पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोक शाळेजवळ दाखल झाले. या कार्यक्रमाबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनाही पुसटशी कल्पना नसल्याची बाब समोर आली आहे. प्रशासनाने परवानगी दिलेले कदमवाडी हे ठिकाण शाळेपासून दूर आहे. तसेच उर्दू शाळा ही कोकणनगरच्या एका अंतर्गत रस्त्याला आहे. संघाच्या संचलनचा कार्यक्रम उर्दू शाळेत होत असल्याचे पाहून तेथील नागरिकांमध्ये काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चाळीस वर्षात असा कोणताही कार्यक्रम या उर्दू शाळेत झालेला नाही, कार्यक्रमाला परवानगी दिली कोणी असा खडा सवाल दाखल झालेल्या नागरिकांनी पोलिसांसमोर उपस्थित केला. परंतु पोलिसांनी गांभीर्यता लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखत सुरू असलेल्या संचलनाच्या ठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात केला. शाळेतुन संचलन सुरू झालेल्या प्रकाराने आधीच संतप्त झालेल्या मुस्लिम बांधवांनी रॅली अर्धी निघून गेल्यानंतर नारा – ए – तकबीर, ‘अल्लाहु अकबर’ अशा घोषणा दिल्या. जमावाला शांत राहण्याचे पोलिसांनी आवाहन केल्यानंतर संतप्त झालेला जमाव शांतही झाला.
दरम्यान त्याच रात्री दहाच्या सुमारास भाजप पदाधिकाऱ्यांसह हिंदुत्व कार्यकर्त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत घोषणा देणाऱ्यांना कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पोलीस ठाण्यात अनेक हिंदुत्व कार्यकर्ते एकवटले होते. या एकवटलेल्या कार्यकर्त्यापैकी काही कार्यकर्ते मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास चर्मालय मार्गाच्या दिशेने निघाले, त्यांच्या पाठोपाठ तत्काळ पोलिसांनी देखील धाव घेतली. चर्मालय परिसरात जमाव आल्यानंतर दोन तरुण त्याठिकाणी आले. त्याठिकाणी बाचाबाची झाल्याने त्या दोन तरुणांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर एक तरुण पळून गेला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्या तरुणाला देखील ताब्यात घेतले होते.
चर्मालय येथे जमलेला जमाव कोकणनगर येथे जाण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र जमावाला पोलिसांनी आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराच दिला. संतप्त झालेल्या पोलिस निरीक्षक तोरस्कर यांनी जमावाला चांगलेच खडसावले. नोकरी गेली तरी बेहत्तर मात्र कायदा हाती घेऊ देणार नाही असा इशाराच त्यांनी दिला.
अचानक कोकणनगर पोलिस चौकी शेजारील मोहल्ल्यात जय श्रीरामच्या घोषणा सुरु झाल्या. त्यामुळे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांची धावपळ सुरु झाली. जमाव अधिकच आक्रमक झाला होता. दंगा काबू पथक घटनास्थळी दाखल झाले होते. कोकणनगर येथे मध्यरात्री बिघडू लागल्याने पोलिसांनी सुरुवातीला जमावाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पोलिसांनी अखेर जमावाला पांगवण्यासाठी लाठ्यांचा प्रसाद देण्यास सुरुवात केली. कोकणनगरमध्ये दाखल झालेला जमावातील कार्यकर्ते सैरावैरा इकडे-तिकडे पळत सुटले. पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले आणि कोकणनगर पोलिस चौकीत बसवून ठेवले. यावेळी आलेल्या जमावाने कोंकणनगर येथील काही घरांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र रत्नागिरी पोलिसांनी बाजी लावून आपल्या कौशल्याने ही सर्व परिस्थिती हाताळली. दुसऱ्या दिवशी हे सर्व प्रकरण नागरीकांना समजताच चौकाचौकात चर्चा रंगू लागल्या आहेत.
परस्परविरोधी गुन्हे दाखल
या संपूर्ण प्रकरणात शहर पोलिस स्थानकात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी माजी नगरसेवक मुसा काझी व इतर १० ते ११ जणांवर भारतीय न्यायसंहिता २३ चे कलम १९० (१), १९० (२), १९१ (१), १९२, १९५, १९६, ५७ महाराष्ट्र पोलिस कायदा अधिनियम ३७/१३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याची फिर्याद वरुण शामसुंदर पंडीत यांनी शहर पोलिस स्थानकात दिली आहे. तर दुसरा गुन्हा पोलिस हेडकॉन्स्टेबल उमेश कृष्णा पवार यांच्या तक्रारीवरुन दाखल झाला आहे. कोकण नगर चौकीबाहेर मोहल्ल्यात जय श्रीरामच्या घोषणा देत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडवली आणि दोन तरुणांना मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी सागर प्रकाश कदम, यश नितीन सुर्वे, शुभम संजय साळवी यांच्यासह इतर ३० ते ४० जणांविरुध्द भारतीय न्याय संहिता १८९ (२), १९०, १९१ (२), १९६, ११८, ५७ महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७/१३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
शहरासह ग्रामीण भागात नवरात्र उत्सवाचे वातावरण आहे. अशातच दगडफेक, नारेबाजी हा सर्व प्रकारातून रत्नागिरी पोलिसांनी महत्वाची कामगिरी केली. पोलीसांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे हिंसक होणारे वातावरण निवळले. धार्मिक सलोखा बिघडवण्याच्या कामात गुंतलेल्या शक्तींना जरब बसवण्याचा प्रयत्न झाला. तसेच दुसऱ्या दिवशीही कोणताही प्रकार घडू नये यासाठी कोकणनगर परिसरातील महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
….याची दक्षता घेतली पाहिजे
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील राजकीय अनिश्चितता वाढली असून, सत्तास्पर्धा तीव्र झाली आहे. पक्षांमध्ये फोडाफोड करून सरकार स्थापन करायचे वा ते अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न झाले आहेत. मात्र, आगामी निवडणुकांत सत्तेच्या बळावर व भरपूर जाहिरातबाजी करूनही यश मिळण्याची शक्यता धूसर दिसत असेल, तर मते मिळवण्यासाठी ध्रुवीकरणाचा मार्ग स्वीकारला जात असावा, अशी चर्चा आहे. मात्र, सत्ताधारी व विरोधी पक्षांनी आपल्या स्पर्धेपायी जातीय तणाव निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. कारण, दंगलीत शेवटी जीव जातो, तो सामान्य माणसाचा हे विसरता कामा नये.
“रत्नागिरी 24 न्युज”च्या वतीने आवाहन
अशा घटना घडूनही लोकांनी कोणतीही आततायी प्रतिक्रिया न देता शांतता टिकवून दाखवलेला संयम आणि समजूतदारपणा नक्कीच कौतुकास्पद आहे. संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणादायी आहे. ‘सलोखा’ हा समाजातील धार्मिक आणि जातीय सलोखा टिकून रहावा, वाढावा यासाठी प्रत्येकाने सहकार्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे. विशेषत: बहुसंख्य लोकशाहीवादी नागरिकांच्या पुढाकाराने असे प्रयत्न झाले तर नागरिकांना अधिक सुरक्षित वाटेल आणि समाजातील सलोखा आणि सामंजस्यही टिकेल. त्यामुळे मध्यरात्री घडलेल्या घटनेचे व्हिडिओ प्राप्त झाले असले तरी सलोखा निर्माण व्हावा या दृष्टीकोनातून घटनेचा कोणतेही व्हिडिओ 24 न्यूजकडून प्रसारित केले जाणार नाही. प्रत्येकाने आपल्या स्तरावर सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा असे जाहीर आवाहन रत्नागिरी 24 न्युजच्या माध्यमातून करण्यात येत आहे.