(रत्नागिरी / प्रतिनिधी)
अमली पदार्थ विरोधी मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. २६ एप्रिल) उद्यमनगर भागात कारवाई करत तीन तरुणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ३५३ ग्रॅम गांजा, दोन दुचाकी आणि चार मोबाईल असा एकूण २ लाख २३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे अत्ताउल्ला सलिम पटेल (३५, रा. उद्यमनगर), फहाद मुस्ताक पाटणकर (रा. शिवाजीनगर) आणि आयान अजिज मुल्ला (रा. उद्यमनगर) अशी आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उद्यमनगर ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना दोन दुचाकींवर संशयास्पद हालचाली करणारे हे तिघे तरुण पोलिसांच्या नजरेस पडले.
पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली असता, त्यांच्या ताब्यात गांजा आढळून आला. गांजाचे वजन ३५३ ग्रॅम इतके असून, हा अमली पदार्थ ताब्यात घेण्यात आला. यासह वापरलेल्या दोन दुचाकी व चार मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केले.
या तिघांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. चित्र, श्री. बार, तसेच पोलीस हवालदार शांताराम झोरे आदींच्या पथकाने केली.