(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कोंडीवरे मोहल्ल्यात नुरी समीर कापडी (वय ४२) यांच्या राहत्या घरी मध्यरात्री घरफोडीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन तरुणांविरोधात संगमेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी पहाटे २.३० ते ३.३० दरम्यान घडली.
फिर्यादी नुरी कापडी या आपल्या कुटुंबासह घरात झोपल्या असताना, रात्री सुमारे २.३० वाजता घराच्या कौले वाजल्याचा आवाज आला. त्यांनी जागे होत किचनमध्ये जाऊन पाहिले असता, आरोपी मुफिद अल फरिद बोरकर (वय २२) हा घराच्या कौले काढून घरात घुसण्याचा प्रयत्न करताना दिसून आला. यावेळी नुरी कापडी यांनी आरडाओरड केली असता, घराबाहेरून दुसरा आरोपी अल साहिल ऐजाज काळसेकर (वय ३४) याचा आवाज ऐकू आला.
दोन्ही आरोपी दारू, चरस व गांजाचे व्यसनी असून, वाईट उद्देशाने घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर ६९/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१(२), ६२, ६४ अंतर्गत संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत